शतका इतकं समाधान व आनंद क्रिकेटपटूला कुठलं असणार ? शतक करण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी संबंधीत खेळाडू जीवाचं रान करतो हे आपल्याला माहीतच आहे, आणि शतकाचं स्वप्न सत्यात उतरल्यानंतर त्या खेळाडूला होणारा आनंद प्रत्येकाला रोमांचित करून जातो. शतक करणाऱ्या खेळाडूला आपला संघ जिंकावा व आपल्या कष्टाचे चीज व्हावे असे वाटणे साहजिक आहे. परंतु जर एखादया खेळाडूने शतक करूनही तो सामना त्याचा संघ हारला तर त्या खेळाडूला अतोनात यातना होत असतील हे नक्की !
प्रस्तुत लेखात आज आपण भारताकडून खेळताना एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक करूनही भारताला पराभव स्विकारावा लागला अशा पाच कमनशिबी फलंदाजांच्या शतकाविषयी जाणून घेऊ या.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकवूनही भारताच्या पदरी पराभव पडणारा पहिला कमनशिबी खेळाडू आहे भारताचा माजी कर्णधार व कर्नल म्हणून परिचित असलेला दिलीप वेंगसरकर. तो भारताकडून १२९ सामने खेळला. भारतासाठी त्याने अनेक विजयात मोलाचे योगदान दिले. मात्र त्याने वनडेमध्ये झळकविलेल्या एकमेव शतकावेळी भारताला दुर्देवीरित्या पराभव पत्करावा लागला. सन १९८४ मध्ये पुण्यात इंग्लंडविरुद्ध त्याने १२४ चेंडूत १०५ धावा काढल्या. मात्र भारताला फक्त ६ बाद २१४ धावाच उभारता आल्या. परिणामतः इंग्लंडने ४३.२ षटकात ४ गडी राखून भारताला लोळवले.
क्रिकेटच्या मैदानावरील पहिला शहीद खेळाडू ठरला भारताचा माजी सलामीवीर रमण लांबा. रमण लांबा भारतासाठी ३२ वनडे सामने खेळला. त्यामध्ये त्याने २७ च्या सरासरीने ६ अर्धशतके व एकमेव शतकाच्या साह्याने ७८३ धावा ठोकल्या.
सन १९८६ राजकोट येथे ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळताना लांबाने आपले एकमेव शतक सलामीला येत ठोकले होते. १२० चेंडूच्या आपल्या खेळीत त्याने १०२ धावा फटकविल्या व भारताला ६ बाद २६० अशी मजबूत धावसंख्या गाठून दिली. परंतु प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४६.३ षटकात विजयी लक्ष गाठून भारताला ३ गडी राखून पराभूत केले व लांबाचे शतक वांझोटे ठरविले.
मधल्या फळीतील तंत्रशुध्द फलंदाज संजय मांजरेकर भारताकडून एकदिवसीय सामने खेळला, त्यामध्ये ३३.२३च्या सरासरीने १५ अर्धशतके व एका शतकासह १९९४ धावा बनविल्या. सन १९९१ मध्ये दिल्ली येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या ८२ चेंडूत ८ चौकार व दोन षटकारांसह १०५ धावा तडकावल्या. भारताने ४ बाद २८७ धावा फलकावर लावल्या तरीही द.आफ्रिकेने आठ गडी राखून विजयी लक्ष गाठले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात द. आफ्रिकेचा भारताविरूध्दचा हा पहिलाच विजय होता.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रॉबीनसिंग सिनियर हा डावखुरा खेळाडू देखील या कमनशिबी खेळाडूंच्या क्लबमध्ये समाविष्ठ आहेे. सन १९९७ मध्ये कोलंबो येथे रॉबीनने श्रीलंकेविरुद्ध १०२ चेंडूत ११ चौकार व २ षटकारांसह शतक ( बरोबर शंभर ) धावा ठोकल्या. रॉबीनच्या शतकाच्या बळावर भारताने ९ बाद २९१ अशी समाधानकारक धावसंख्या रचली. मात्र पावसाने भारताच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरताना १९ षटकात ६ बाद १३२ अशी श्रीलंकेची अवस्था असताना खल घातला. अंततः सामना निकालाविना थांबवावा लागला. भारताचा विजय हुकला पण रॉबीनची झुंजार खेळीही वाया गेली.
विद्यमान भारतीय संघातला प्रतिभावान खेळाडू श्रेयस अय्यर भारतातर्फे १८ वनडे सामने खेळला. त्यात ८ अर्धशतके व एका शतकासह ७४८ धावा काढल्या आहेत. सन २०१९ च्या उत्तरार्धात न्युझिलंडविरूध्द हॅमिल्टन वनडेत १०७ चेंडूत ११ चौकार व एका षटकारासह १०३ धावा ठोकल्या. श्रेयसच्या जोरदार खेळीमुळे भारताने ४ बाद ३४७ धावा कुटल्या, मात्र किवीजने ११ चेंडू व ४ गडी राखून विजय मिळविताना अय्यरला शतकाचे श्रेय मिळू दिले नाही.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
