जेंव्हा एखादया खेळाडूला त्याच्या देशाच्या राष्ट्रीय संघात प्रवेश मिळतो तेव्हा त्याच्या मनात एक उत्कठ भावना तयार होते की, त्याच्या संघाकडून सर्वोच्च अशी जागतिक स्पर्धा खेळण्याची संधी मिळावी. तसे बघाल तर आपल्या कसोटी, वनडे कारकिर्दीत अतिशय नेत्रदिपक खेळ करूनही एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा खेळायला न मिळालेल्या खेळाडूंची संख्या फार मोठी आहे. परंतु प्रस्तुत लेखात आपण अशा काही मोजक्या क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर नजर टाकणार आहोत की, ज्यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द खरोखरच दृष्ट लागण्यासारखी आहे. परंतु नशिबाची म्हणा किंवा निवड कर्त्यांची, महत्वाच्या क्षणी साथ न मिळाल्याने त्यांच्या दिर्घ कारकिर्दीत एकदाही एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही.
एकेकाळी भारतीय फलंदाजीचा कणा असलेला व्हीव्हीएस लक्ष्मण सन १९९६ ते २०१२ या कालखंडात भारतीय संघाचा प्रमुख घटक होता. या दरम्यान १३४ कसोटीत ४५.५च्या सरासरीने ८७८१ धावा बनविल्या. तर ८३ एकदिवसीय सामन्यात २३३८ धावाही फटकविल्या. शिवाय सन २००१ ला ऑस्ट्रेलियाविरूध्द कोलकात्यात २८१ धावांची ऐतिहासिक खेळी करून भारताला आश्चर्यकारक विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याशिवाय संपूर्ण कारकिर्दीत सतत संघाच्या हिताचीच कामगिरी त्याने बजावली, परंतु त्याला एकदाही विश्वचषकाच्या संघात निवडण्याची तसदी निवड समितीने घेतली नाही.
इंग्लंडचा माजी कर्णधार अलिस्टर कुक याने २००६ मध्ये नागपूर येथे भारता विरूध्द कसोटीत शतकी पदार्पण केले. शिवाय सन २०१८ मध्ये मायदेशात भारताविरूध्दच कारकिर्दीतील अंतिम कसोटी खेळला. तिच्यातही त्याने शतकी चमत्कार केला. शिवाय अखंडपणे विश्वविक्रमी १५८ कसोटी खेळण्याचा पराक्रमही त्याने केला. एकूण १६१ कसोटयात ३३ शतके व ५७ अर्धशतकांसह १२४७२ इतक्या धावाही फटकविल्या. त्याची गणना जगातल्या सर्वात यशस्वी फलंदाजात केली जाते. तसेच त्याला इंग्लंडचा सर्वोच्च नाईटहूड " सर " किताबही मिळाला आहे.
शिवाय ९२ वनडेत ३६.४० च्या सरासरीने ५ शतके व १९ अर्धशतकांसह ३२०४ धावा कुटूनही निवड समिती त्याला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या संघात निवडण्याच्या लायकीचा समजली नाही.
ऑस्ट्रेलियाच्या सर्वकालीन महान फलंदाजांत गणला जाणारा डावखुरा सलामीवीर जस्टिन लँगरही विश्वचषक स्पर्धा खेळायला न मिळालेल्या कमनशिबी खेळाडूत सामील आहे.आजच्या घडीला तो ऑस्ट्रेलिया संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच्या कसोटी जीवनात तो १०५ सामने खेळला, त्यात ४५.२७ च्या सरासरीने ७६९६ फटकविल्या. मात्र एकदिवसीय सामन्यात त्याला केवळ ८ सामन्यात संधी मिळाली. त्यात त्याने ३२ च्या सरासरीने केवळ १८० धावा काढल्या. कदाचित पुरेशी संधी मिळाली असती तर तो चमत्कारही करू शकला असता, परंतु निवड समितीचं धोरण त्याच्या बाबत वेगळंच होतं.
ईशांत शर्मा हा आजच्या भारतीय कसोटी संघातला सर्वात वरिष्ठ, अनुभवी व यशस्वी गोलंदाज. सन २००७ मध्ये त्याने भारतीय संघात पदार्पण केले. त्यानंतर त्याच्या खेळात व वेगात सतत वृध्दी होत गेली. त्या बळावर तो ९७ कसोटी खेळता त्यात २९७ बळी मिळविले, ८० वनडेत ११५ बळी घेतले, तर १४ टि-२० मध्ये ८ फलंदाज बाद केले. परंतु निवड समितीने त्याला एकाही विश्वचषक स्पर्धेत खेळण्यायोग्य समजले नाही.
भारताचा नवा मिस्टर डिपेंडेबल चेतेश्वर पुजारा कसोटीत राहुल द्रविडचा वारसा यशस्वीपणे चालवित आहे. सन २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्द बंगलोर कसोटीत पदार्पण करणारा चेतेश्वर कसोटी संघात चपखल बसला खरा, पण एकदिवसीय संघात तोच चाणाक्ष खेळ त्याला जमला नाही. त्यामुळे निवड समितीने त्याला विश्वचषकाच्या संघात निवडण्याची तसदी घेतली नाही.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
