कोरोना व्हायरसमुळे शेकडो वर्षांची ग्रामीण जत्रांची परंपरा खंडीत झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) आपल्या भारत देशासह संपूर्ण महाराष्ट्र आणि कोकणातील जनतेकडून जत्रा, सण, उत्सव आणि सांस्कृतिक परंपरा मोठ्या मनोभावे जपल्या जातात. जत्रा, सण, उत्सवाच्या काळात ग्रामीण भागातील सर्व जनता चाकरमानी आपापल्या कामाच्या ठिकाणांहून गावी एकत्र येऊन हे सण, जत्रा आणि उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करतात.
ग्रामीण भागातील या सण उत्सव परंपरा मधील शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या सामाजिक परंपरा मधील जत्रा हा प्रकार कोकणातील बहुतेक गावात त्या त्या ठिकाणच्या पुर्वापार चालत आलेल्या स्थानिय वेळ, काल व परंपरा नुसार काही ठिकाणी दिवसा तर काही ठिकाणी रात्री अशा वेळेत साजर्या केल्या जातात. कोकणातील बहुतेक ठिकाणच्या ग्राम जत्रा चैत्र महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात संपन्न होतात.
कोकणातील लहान थोर स्त्री पुरुष आबालवृद्धांना ज्या जत्रांची ओढ लागलेली असते त्या ग्राम दैवतांच्या जत्रा सर्व ठिकाणच्या आणि सर्व उत्सव या वर्षी आपल्या देशातील कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून शासनाच्या आदेशानुसार पुर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील पेण तर्फे तळे, मोर्बा, निजामपूर, खरवली, साई, आमडोशी, बोरघर, माणगांव, जुने माणगांव, गोरेगांव आणि इंदापूर इत्यादी ठिकाणच्या जत्रा पुर्वी पासून खूप प्रसिद्ध आहेत. या ठिकाणच्या जत्रा दुपारी चार वाजल्यापासून सुरू होतात. जसजशी रात्र होते तसतशी जत्रा तालुक्यातील तमाम आबालवृद्ध जत्रा प्रिय ( जतरकरी ) यात्रेकरूंच्या प्रचंड गर्दीने फुलत जाते. या जत्रेमध्ये सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची, सौंदर्य प्रसाधने, लहान मुलांची खेळणी, मनोरंजनाची साधने, कपडे, चपला, हाॅटेल आणि मिठाईची दुकाने इत्यादी प्रकारच्या दुकाने असतात. या जत्रांच्या माध्यमातून स्थानिक ग्रामीण भागातील शेतकर्यांना आपल्या शेतीमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होते. या जत्रांच्या माध्यमातून लाखो, करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. मात्र या वर्षी संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने या कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी देशात सर्वत्र लाॅकडाऊन संचारबंदी सुरू केली आहे. त्यामुळे सर्व ठिकाणच्या जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे शेकडो वर्षांपासून ग्रामीण भागात चालत आलेल्या ग्रामीण जत्रांची परंपरा या वर्षी कोरोना व्हायरसमुळे खंडीत झाली आहे.
या शिवाय सर्व जत्रा रद्द झाल्याने ग्रामीण भागातील छोटे मोठे उद्योग धंदेवाले, दुकानदार, व्यापारी आणि शेतकरी वर्गाला आणि परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
