Halloween party ideas 2015


विस्डेन आणि भारतीय क्रिकेट
विस्डेन म्हणजे काय ? विस्डेनमध्ये नेमकं काय असतं ? आणि हो, या विस्डेनचा व भारतीय क्रिकेटचा संबंध काय ? असे अनेक विचार आपल्या डोक्यात विजेच्या बल्बागत चमकले असतील. तर चला आपल्या उत्सुकतेची जास्त परिक्षा न घेता थेट मुख्य मुद्दयालाच हात घालू या.
विस्डेन आणि क्रिकेट, क्रिकेट आणि विस्डेन ही अगदी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विस्डेन ही परंपरा थोडीथोडकी नव्हे, तर चक्क दीडशे वर्षांची आहे. जसं प्रत्येक धर्मातल्या ग्रंथाला त्या त्या धर्मात अनन्य साधारण महत्व असते अगदी तसंच महत्व क्रिकेट मध्ये विस्डेनला आहे. इंग्रज लोक तर चक्क विस्डेनला क्रिकेटचं बायबलच संबोधतात !
विस्डेन हे काही क्रिकेटची सर्वोच्य संस्था आयसीसी किंवा एमसीसीचे मुखपत्र नाही. परंतु या वार्षिक नियतकालीकात जगभरात पूर्ण वर्षात होणाऱ्या क्रिकेटच्या प्रत्येक घडामोडीचा, धावफलकांचा, आकडेवारीचा, विक्रमांचा समावेश असतो. जागतिक क्रिकेटचं हे प्रमुख नियतकालिक नसलं तरी यातील प्रत्येक नोंद अधिकृत मानली जाते. यातील आकडेवारीला आव्हान देण्याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. कारण त्याच्यामागे आहे दीडशे वर्षांची परंपरा. म्हणजे पहिला अधिकृत कसोटी सामना होण्यापूर्वीच हे नियतकालिक इंग्लंडमध्ये प्रकाशित होत आहे. कारण जगातली पहिली कसोटी झाली सन १८७७ साली. १५, १६, १७ आणि १९ मार्च हे चार दिवस व विस्डेन प्रथम प्रकाशित झाले ते सन १८६४ मध्ये.
विस्डेन हे आज क्रिकेटचं पंचांग म्हणून ओळखले जाणारे नियतकालिक सुरू केलं ते जॉन विस्डेन नावाच्या एका क्रिकेटपटूने. व्हिक्टोरियन युगातल्या खेळाडूंपैकी तो होता. पाच फुट चार इंच उंचीच्या या खेळाडूला " लिटल वंडर " म्हणून ओळखलं जायचं. कारण त्याने एका सामन्यात सर्वच्या सर्व दहा फलंदाजांना त्रिफळा बाद केले होते. सन १८५९ मध्ये अमेरिका व कॅनडाच्या दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघाचा तो सदस्य होता.
       विस्डेनचा पहिला अंक ११२ पानांचा होता. आज तो १५०० पानांचा आहे. सुरुवातीच्या काळात त्यात काय टाकावं हा प्रश्न पडायचा तर आता काय वगळावं हे समजत नाही. सन १९६३ च्या शतकी अंकाची ( सर्व शंभर अंकाची ) किमत २५० पौंड होती.आज तिच किंमत एक लाख पौंड म्हणजे पाऊण कोटीच्या घरात गेली आहे. पूर्वी गुलाबी रंगाचं मुखपृष्ठ असलेलं हे नियत कालिक आता पिवळ्या रंगाचे आहे. सन २००३ पासून यावर क्रिकेटपटूचा फोटो छापायला सुरुवात झाली आणि तो मान मिळाला इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याला.
                   या मानाच्या पुस्तकात आपल्या नावाची नोंद व्हावी हे  जगभरातल्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. इंग्लंडमध्ये त्या सत्रात चांगली कामगिरी करण्याची विस्डेनची प्रथा आहे. परंतु सन २००१ मध्ये कोलकात्यात व्हिव्हिएस लक्ष्मणने ऑस्ट्रेलिया विरूध्द केलेली २८१ धावांची एकमात्र ऐतिहासीक खेळी की जी इंग्लंड बाहेर खेळली गेली तिचा त्यात समावेश आहे. भारताने १९३२ साली कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली परंतु आतापर्यंत दरवर्षी ज्या पाच सर्वोत्तम खेळाडूंची या पुस्तकात नोंद होते त्यात केवळ १७ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.सीके  नायडू ( १९३३ ) , विजय मर्चेंट ( १९३७), वीनू मांकड़ ( १९४७), मंसूर अली खान पटौदी ( १९६८), भागवत चंद्रशेखर ( १९७२), सुनील गावसकर ( १९८०), कपिल देव ( १९८३), मोहिंदर अमरनाथ ( १९८४), दिलीप वेंगसरकर ( १९८७), मोहम्मद अझहरूद्दीन ( १९९१), अनिल कुंबळे ( १९९६), सचिन तेंडुलकर ( १९९७), राहुल द्रविड़ ( २०००), व्हीव्हीएस लक्ष्मण ( २००२), झहीर खान ( २००८), शिखर धवन ( २०१४) व विराट कोहली ( २०१९) यांचा समावेश आहे.
                    आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताकडून दस्तुर खुद्द इंग्लंडमध्येच भरीव कामगिरी करणारे सौरव गांगुली, एमएस धोनी, रोहीत शर्मा, गुंडाप्पा विश्वनाथ, विरेंद्र सेहवाग, बिशनसिंग बेदी, हरभजन सिंग, इरापल्ली प्रसन्ना, एस वेंकटराघवन, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, जवागल श्रीनाथ , इंशात शर्मा यांच्या नावाचा समावेश अद्यापही झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लेखक : - 
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.