महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण पुणे व युनिसेफ मुंबई ,महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विध्यमाने अमळनेर येथील रोटरी हॉलमध्ये तालुकास्तरिय सर्व शाळांतील महिला शिक्षिकांसाठी मासिक पाळी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर नुकताच दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग अमळनेर पंचायत समितीच्या वतीने घेण्यात आला. सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांच्या हस्ते शिक्षण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तद्नंतर तज्ञमार्गदर्शक म्हणून अनिता बोरसे, वंदना नेतकर, सुशीला अहिरे, ममता महालपुरे, आणि सुनंदा पाटील यांनी सदर प्रशिक्षण घेण्याचा उद्देश, पार्श्वभूमी आणि गरज याविषयी उपस्थित सर्व महिला शिक्षिका यांच्यात गटचर्चा घडवून आणली. त्यात किशोरवयीन अवस्था व शारीरिक होणारे बदल, नैसर्गिकरित्या बदलाबाबत पूर्वग्रह , मासिक पाळी म्हणजे काय ? मासिक पाळी संबंधी आव्हाने व त्यावर उपाययोजना, मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी व त्याचे परिणाम , मासिक पाळीच्या सामाजिक अंधश्रद्धा, त्याबाबतीत गैरसमज याविषयी सविस्तर गटचर्चा करण्यात आली .आणि विविध खेळाच्या मनोरंजनातून हसतखेळत प्रशिक्षण घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना नेतकर यांनी केले. तद्नंतर प्रशिक्षणार्थी शिक्षिकांमधून जयश्री पवार, सविता अहिरे, कविता पाटील, आणि छाया इसे यांनी मनोगत व्यक्त करतांना सदर प्रशिक्षण ही काळाची अत्यावश्यक गरज आहे आणि त्याचा फायदा आणि सामाजिक गैरसमज नष्ट होण्यास मदतच होईल . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे तंत्रनिर्देशक म्हणून पुनवटकर सर, नरेंद्र चौधरी, आणि शितल भदाणे , यांनी सहकार्य केले. सदर प्रशिक्षण सुरळीतपणे पार पाडतांना दोन दिवस गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन आणि सर्व तज्ञमार्गदर्शक यांच्यावतीने स्वादिष्ट भोजन आणि चहापाणी वेवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व तज्ञमार्गदर्शक यांना प्रशिक्षणार्थी यांनी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
