आजकाल संपूर्ण जगभर जर कोणी थैमान घातले असेल तर ते कोरोना व्हायरसने. चीनच्या वुहान शहरातून या अज्ञात आजाराने आज जगभरातील जवळजवळ ८५ देशांत रुद्ररूप धारण केले आहे. या महाभयंकर आजाराने हजारो लोक मृत्यूमुखी पडले तर अनेकांना याची लागण झाली असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. याचा फटका टोकीओ ऑलिंपिकला बसण्याची शक्यता असून यंदाचे ऑलिंपिक रद्द होण्याची शक्यता असून जगाच्या कानाकोपऱ्यात खेळले जात असलेल्या विविध खेळांच्या स्पर्धा स्थगित अथवा रद्द केल्या जात आहेत. हा जीवघेणा करोना व्हायरस क्रिकेटच्याही मागे लागल्याने या आजाराच्या भितीने दोन मोठया क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या.
सन २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या संघांची पात्रता फेरी रद्द करण्यात आली आहे. १६ मार्च ते २६ मार्च या कालावधीत मलेशियात घेेण्यात येणारी २०२३ विश्वचषकासाठीची चॅलेंज ए लीग कॉलीफायर स्पर्धा कोरोनामुळे तूर्त रद्द करण्यात आली आहे. कदाचित पुढच्या वर्षी ती होऊ शकते. कॅनडा, डेन्मार्क, मलेशिया, कतार, सिंगापूर, वनुआतू हे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तसेच थायलंडमध्ये एप्रिल महिन्यात होणारी महिलांची चार देशांची टि-२० स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
नेपाळ मध्ये होणारी एवरेस्ट प्रिमीयर लिग- २०२० ( ईपीएल ) स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ख्रीस गेल, कोरी अँडरसन, मोहम्मद शेहजाद, संदिप लामीछने सारखे अनेक मान्यवर खेळाडू सहभागी होणार होते. परंतु नेपाळमध्येही कोरानाचे पेशंट आढळल्याने नेपाळ सरकारने सतर्कता बाळगली आहे.
जगातील सर्वात मोठी लिग क्रिकेट म्हणून गणली जाणारी इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएलचे आयोजनही धोक्यात आले आहे. २९ मार्च २०२० पासून आयपीएल सुरू होण्याची नियोजित तारीख आहे. बीसीसीआय पुरस्कर्ते व ब्रॉडकास्टरचे पैसे वसूल होण्यासाठी रिकाम्या मैदानात सामने खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण त्यांना सर्वात जास्त पैसा टिव्ही प्रक्षेपणातूनच येतो. त्यामुळे कोटयावधींची गुंतवणूक केलेल्या ब्रॉडकास्टर्सना खुश करण्याचा पर्याय त्यांच्यासाठी खुला आहे. परंतु यासाठी त्यांना केंद्र सरकार व आरोग्य मंत्रालयाची परवानगी महत्वाची आहे.
स्विस फुटबॉल लिग, आशियाई चँपीयनशीप लिग, युरो लिग या अग्रगण्य फुटबॉल स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. डेव्हीस चषक टेनिस स्पर्धेसाठी चिनचा संघ रुमानिया मध्ये खेळणार होता, परंतु तो संघही तेथे गेला नाही. मलेशियात होणारी सुप्रसिद्ध अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
कोरोनाची भिती आता सामान्य माणसांपर्यंत पोहोचल्याने प्रत्येकाने सावधानता बाळगणे गरजेचे आहे. मास्कचा उपयोग करणे, हस्तांदोलन टाळणे, सार्वजनिक कार्यक्रमांपासून शक्यतो दूर राहाणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, उघडयावरचे पदार्थ खाण्याचे टाळणे, शक्य तेंव्हा साबणाने हात स्वच्छ करणे या बाबींचे पालन केल्यास कोरोना आपल्या पर्यंत पोहोचणे अवघड आहे.
परंतु या कोरोनाने क्रिकेट सह संपूर्ण क्रिडा क्षेत्रालाही बाधीत केल्याने खेळाडू, संयोजक, प्रायोजक व प्रेक्षक यांचा जीव टांगणीला लागला आहे हे मात्र निश्चित !
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
