Halloween party ideas 2015


मानहानी व पिछेहाट हेच न्यूझिलंड दौऱ्यातील फलीत
भारतीय क्रिकेट साठीदु:खद स्वप्न ठरलेला न्यूझिलंड दौरा नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच संपला. याच बरोबर भारतीय खेळाडूंबरोबरच भारताच्या तमाम समर्थकांनी एकदाचा सुटकेचा निःश्वास टाकला असेल. त्याचं कारण असं आहे की आता तरी न्यूझिलंडमध्ये भारताचं हरणं थांबेल. वनडे व कसोटी मालिकेत न्यूझिलंडने भारताचं अक्षरशः पानिपत केलं. तीन वनडेत व पहिल्या कसोटीत फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात भारताचं शिकरण झालं तर दुसऱ्या कसोटीत गोलंदाजांनी पहिल्या डावात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली परंतु दुसऱ्या डावात फलंदाजांचा बेजबाबदार खेळ गोलंदाजांना पुरेशे पाठबळ देण्यास कमी पडला.परिणामत: छोट्याशा भांडवलावर न्युझिलंडचे १० गडी खरेदी करण्यास गोलंदाज अपयशी ठरले.
या संपूर्ण दौऱ्यात जगातील सर्वात बलाढय गणली जाणारी भारतीय फलंदाजांची फौज कुचकामी ठरली. नियमीत सलामीवीर रोहीत शर्माची गैरहजेरी, नवोदित पृथ्वी शॉचा तोकडा अनुभव, सलामीचा दुसरा शिलेदार मयंक अग्रवालच्या खेळात नसलेले सातत्य, तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात भरवशाचा व तंत्रशुध्द फलंदाज म्हणून नावलौकिक असलेल्या चेतेश्वर पुजाराचा कुर्मगती खेळ, कर्णधार कोहलीची न्यूझिलंडच्या गोलंदाजांनी केलेली नाकाबंदी, उपकर्णधार अजिंक्य राहाणेची उडालेली गाळण, हनुमान विहारीकडे नसलेली गगनभरारीची झेप, लाडक्या रिषभ पंतचे पाचवीलाच पुजलेले अपयश, जगातला नंबर एक गोलंदाज जसप्रित बुमराहकडे यशस्वी होण्यासाठी नसलेली पुरेशी तंदुरुस्ती, इंशात शर्माची फिटनेस चाचणीची साशंकता, मोहम्मद शमीची पहिल्या कसोटीतील शिथिलता, उमेश यादव सारख्या तंदुरुस्त सक्षम खेळाडूचा योग्य न केलेला उपयोग, आश्वीन कि जडेजा या पेचात दोघांनाही गमवावा लागलेला आत्मविश्वास संघाच्या सफसेल शरणागतीचे कारणं ठरली.
कर्णधार कोहलीवर पूर्ण प्लॅन करून मिळविलेले नियंत्रण न्यूझिलंडच्या चांगलंच पथ्यावर पडलं. कोहलीच्या फलंदाजीच्या अपयशाचा फटका त्याच्या नेतृत्वाला बसला. त्याच्यामुळे त्याची मानसिकता ढासळली. त्याचा परिणाम संघ व परिस्थितीवरचे त्याचे नियंत्रण सुटले. संपूर्ण दौऱ्यात कोहलीची बॅट थंड राहिलीच शिवाय त्याने एक कर्णधार म्हणून घेतलेले निर्णय, संघनिवडीतील मनमानी, फॉर्मातल्या के.एल राहुलला कसोटीसाठी संघात न ठेवणं, जगातला नंबर एकचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाला संघाबाहेर बसवणं तर आत्मविश्वास गमावलेल्या रिषभ पंतची निवड फलंदाज व यष्टीरक्षक म्हणून साफ चुकली. रिषभ पंतला वारंवार संधी देऊन तो तिचा लाभ घेऊ शकत नाही, मग त्याचे इतके लाड का होतात हेच समजत नाही. त्याच्यापेक्षाही अनेक गुणवान खेळाडू थप्पीला पडले आहेत. पण पंतवर होत असलेल्या अतिरिक्त मर्जीमुळे ना त्याच्यात सुधारणा होतेय वा ना दुसऱ्या कोणा चांगल्या होतकरू मुलाला संधी मिळतेय.
एकंदर या दौऱ्याने भारतीय क्रिकेटचा फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त झाले. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे गुणतालिकेतील अव्वल स्थान सध्या जरी अबाधित राहिले असले तरी दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियापेक्षा भारताचे फक्त ६४ गुण जास्त असून भारताचे या स्पर्धेतील बरेचसे कसोटी सामने यापुढे परदेशात असल्याने, आहे या गुणांमध्ये वाढ होण्याची शक्यता कमीच असून कांगारू मुसंडी मारण्याची शक्यताच अधिक आहे. तर या मालिकेपूर्वी पाचव्या स्थानावर असलेल्या न्यूझिलंडला या मालिका विजयाने तिसरे स्थान मिळाले आहे. या विजयाने प्रेरणा घेत न्यूझिलंड पहिल्या दोन स्थानामध्येही जागा मिळवू शकते. आता कसोटी मानांकनातही न्युझिलंडने दुसऱ्या स्थानावर झेप घेतल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. या पराभवाने भारत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून बाहेर गेल्यास
कोणालाही आश्चर्य वाटू नये.
या मालिका पराभवाचे मोठे पडसाद उमटत असतानाच गेले बरेच आठवडयांपासून आयसीसीच्या कसोटी मानांकनात फलंदाजीत विराट कोहलीची व गोलंदाजीत जसप्रित बुमराहची अव्वल स्थानावरून झालेली घसरणही चिंतेचे मोठे कारण आहे. शिवाय संघातले अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत यामुळेही भारतीय संघाची पिछेहाट झाली आहे. परदेशात होणाऱ्या सततच्या पराभवामुळे भारतीय संघाचा जागतिक स्तरावरचा वचक कमी होत असून त्यांची घरका शेर अशी हेटाळणी होत आहे.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.