Halloween party ideas 2015

अखेर चंदू सरवटेंना अष्टपैलूत्वाचा दर्जा मिळालाच नाही
चंद्रशेखर त्रिंबक सरवटे यांचा जन्म २२ जुलै १९२० रोजी मध्यप्रदेशातील सागर येथे झाला. तर २३ डिसेंबर २००३ रोजी इंदोर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सन १९४६ ते १९५१ या कालखंडात ते भारतासाठी ९ कसोटी सामने खेळले. २o जुलै १९४६ रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटीचा श्रीगणेशा करणारे सरवटे " चंदू सरवटे " म्हणूनच परिचित होते. उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक, ऑफब्रेक गोलंदाजी ते करायचे. कसोटीतील त्यांची फलंदाजीची सरासरी मात्र १३.०० तर गोलंदाजीची सरासरी १२४.६६ इतकी होती.
९ कसोटीत २०८ धावा व तीन बळी इतकीच त्यांची कामगिरी असली तरी प्रथम श्रेणीत १७१ सामन्यात ३२.७३ च्या सरासरीने ७४३० धावा व सर्वोच्च २४६ अशी कामगिरी होती. त्यात १४ शतके व ३८ अर्धशतकांचा समावेश होता. त्याचबरोबर ४९४ बळीही त्यांच्या खात्यात जमा होते. डावात ५ किंवा अधिक बळी २६ वेळा तर सामन्यात तीन वेळा १० पेक्षा अधिक बळी घेतले. त्याचबरोबर ९१ झेलही त्यांनी पकडले होते. याचा अर्थ ते खरोखर गुणवान होते परंतु त्यांच्या गुणवत्तेची योग्य पारख न होणे व संधी देताना डावलणे यामुळे त्यांची कसोटी कारकिर्द मोठया प्रमाणात आकार घेऊ शकली नाही.
भारताकडून कसोटी खेळणारे असे अनेक खेळाडू आहेत की क्रिकेटचे गाढे अभ्यासकही त्यांना शुध्द फलंदाज अथवा गोलंदाज म्हणून मान्यता देऊ शकले नाही. किंवा त्यांना अष्टपैलूचा दर्जाही देऊ शकले नाही. त्यापैकी चंदू सरवटे हे एक होते.
सन १९४६ त्यांची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली तेंव्हा कर्णधार नवाब पतौडीलाच सरवटेंच्या गोलंदाजी अॅक्शनवर संशय होता. त्यामुळे पतौडी त्यांना इंग्लीश पंच फेकी गोलंदाजीबद्दल नोबॉल देऊ नये म्हणून कसोटीच नाही तर सराव सामन्यातही खेळवायला कचरायचे. तरीही त्यांनी सरवटेंना मँचेस्टर कसोटीत खेळवलेच.आश्चर्याची गोष्ट या कसोटीत १० व्या क्रमांकावर खेळलेले चंदू सरवटे १९४७ - ४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सलामीवीर म्हणून खेळले तेही चक्क पाच कसोटया !
पूर्वीच्या काळी कोणताही संघ एखादया देशाच्या दौऱ्यावर गेला तर सराव सामनेच अधिक व्हायचे त्यातून मग मुख्य संघ निवडला जायचा. सन १९४६ च्या त्या इंग्लंड दौऱ्यात एक कौंटी सामना खेळला तोच सामना सरवटेंच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय ठरला. त्यामुळेच त्यांचे नाव आजही आठवणीने घेतले जाते. भारत व सरे संघातील तो सामना होता. या सामन्यात भारताचा उपकर्णधार विजय मर्चंट हा नेतृत्व करत होता. मर्चंटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. मर्चंट ५३ व गुलमोहम्मद ८९ धावा यांच्यातील तिसऱ्या गडयांच्या भागीदारीनंतरही भारताचा डाव ९ बाद २०५ असा अडखळला असताना दहाव्या क्रमांकावरील चंदू सरवटेला साथ देण्यासाठी अकराव्या क्रमांकाचा शूते बॅनर्जी आला आणि न भूतो ना भविष्यती असा चमत्कार घडला. सरेचे कसलेले गोलंदाज अॅलेक बेडसर, एरीक बेडसर व आल्फ गॉवरही या दोघांपुढे हतबल झाली. १० व्या गडयासाठी त्यांनी २४९ धावांची भागीदारी केली. तीन तास १० मिनिट चाललेली अफलातून खेळी थांबली तेंव्हा सरवटे १२४ धावांवर नाबाद होते तर बॅनर्जी १२७ धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव ४५४ धावांवर आटोपला. हा सामना भारताने ९ गडयांनी जिंकला त्यात सरेच्या दुसऱ्या डावात सरवटेंनी गोलंदाजीतही चमत्कार करत पाच बळी घेत स्वतःचे नाव अजरामर करून टाकले.
अशा या महान खेळाडूला कसोटीत मोठे नाव कमावता आले नाही पण शेवटच्या गडयासाठी केलेला भागीदारीचा विक्रम भारताकडून अजून कोणीही मोडू शकले नाही. चंदू सरवटेंना आपल्या सर्वांकडून जन्मशताब्दी वर्षात मनःपूर्वक अदरांजली !

लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

    WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

    लोकप्रिय बातम्या

    महत्वाच्या घडामोडी

    Powered by Blogger.