बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) माणगांव तालुक्यातील गुरांना हळवा नावाच्या रोगाची लागण पसरली असुन सदर विचीत्र आजाराच्या संक्रमणात तालुक्यातील अनेक जनावरे बाधित होवून आता पर्यंत तालुक्यातील २० गुरं दगावली असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून समजले. या रोगात क्षार आणि विटांमीन ची कमतरता होऊन जनावर मृत होतो. या आधी जुलै महिन्यात माणगांव तालुक्यातील पेण तर्फे तळे या गावातील अनेक शेतकर्यांची अनेक जनावरे अज्ञात रोगाची शिकार झाली होती. या संकटातून माणगांव तालुक्यातील शेतकरी बाहेर पडतात न पडतात तोच तालुक्यातील इंदापूर विभागातील अनेक गावातील शेतकर्यांच्या पशुधनावर या हळवा रोगाचे नवे संकट कोसळून या रोगाला अनेक जनावरे बळी पडली आहेत. त्यामुळे या विचीत्र आजाराच्या संक्रमणा समोर रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यातील पशुसंवर्धन विभाग पुरता हतबल झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व पशुपालक शेतकरी वर्ग अक्षरशः भयभीत झाला आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे कि, माणगाव तालुक्याच्या इंदापूर विभागातील मूठवली, काळवण, घोडेघुम इत्यादी गावात गेली अनेक दिवस गुरांना ही लागण झाली आहे. जे गुरांचे मालक आपल्या गुरांनां चरण्यासाठी बाहेर पाठवितात आणि ही गुरं मेलेली गुरं किंवा इतर प्राण्यांची हाडे चाटल्याने त्यांच्या शरीरातील क्षार आणि विटामीन कमी होतात आणि या रोगाला बळी पडतात.
सदर रोगांची लागण झाल्याने पशुसंवर्धन अधिकारी यांनी बाधित गावांत जाऊन तेथील शेतकर्यांना एकत्र बसवून या रोगांची माहिती दिली, आपल्या गुरांनां चरण्यसाठी बाहेर सोडू नका, त्याना घरीच चारा घालण्याचे सांगितले आहे.तसेच गावातील मृत जनावराची हाडे जमिनीत पुरून टाका असा उपदेश पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.बी.शहा यांनी शेतकऱ्यांना केला.
निसर्गाच्या अस्मानी संकटातून माणगांव तालुक्यातील शेतकरी बाहेर पडतो ना पडतो तर लगेच या विचीत्र आजाराने तालुक्यातील शेतकर्यांच्या पशुधनावर संकटरुपी संक्रांत आली आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.

