अमळनेर- जर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी व्हायचे असेल तर सुरक्षिततेचा परीघ ओलांडावा लागेल..' असे मत येथील आय.एम.ए.हॉल, जी.एस.हायस्कूल येथे सुरु असलेल्या प्रेरणादीप व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प गुंफतांना दर्जी फाउंडेशन, जळगाव चे संस्थापक प्रा.गोपाल दर्जी यांनी 'स्पर्धापरीक्षा व युवकांपुढील आव्हाने' हा विषय घेऊन मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेरचे नवनिर्वाचित आमदार अनिलदादा पाटील होते.प्रमुख अतिथी म्हणून अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जि. प.सदस्या जयश्रीताई पाटील व ग.स.पतपेढीच्या संचालिका विद्यादेवी कदम होत्या.
प्रा.दर्जी पुढे म्हणाले, इच्छाशक्तीने काम केलं तर स्पर्धापरिक्षेच्या माध्यमातून अधिकारी होता येतं, त्यात कोणतीही परिस्थिती आड येत नाही. झापड लावलेल्या घोड्यासारखे धावले तर इच्छित स्थळी पोहचता येत.पालकांनी विशेषतः आईने मुलांशी शैक्षणिक संवाद साधला पाहिजे.मुलांना संघर्षात जगायला शिकवले पाहिजे.स्पर्धापरीक्षा म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून सर्वांगीण विकास करण्याचं माध्यम आहे.म्हणून त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.धडपडणाऱ्या तरुणांना मदत करणं हे आपलं सामाजिक दायित्व असते.जीवनात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक योगदान अवलंबिले पाहिजे.गणिताचा अभ्यास कृप्त्यांच्या माध्यमातून केल्यास फार सोपा आहे.कॉलेजची मुलं ही कलाकार असतात..
याप्रसंगी तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा वक्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष आमदार अनिल दादा पाटील म्हणाले,'पालकांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार दिले पाहिजे.विद्यार्थ्यांनी प्रथम जीवनात आपले ध्येय ठरवले पाहिजे.तरच यश संपादन करता येतं. स्पर्धेच्या युगात जगायचे असेल तर नियोजन करणे गरजेचे आहे.शालांत जीवनात मला लालदिव्याच्या गाडीत फिरावं असं वाटायचं.
त्यानंतर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंचचे संस्थापक सदस्य दत्ता सोनवणे यांनी केले.वक्त्यांचा परिचय प्रेमराज पवार यांनी करून दिला.सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अशोक पाटील यांनी केले.
चौकट
यांचा झाला सत्कार
विद्यादेवी दामोदर पाटील, प्रकाश भिका पाटील, संजय भगवान पाटील, सतिलाल गंगाराम बोरसे, सुनिल नारायण मोरे, अर्चना मणिलाल बागुल, रणजित शिंदे,गायत्री साहेबराव देसले, भुषण सुरेश महाले, पांडुरंग विक्रम पाटील, आंबापिंप्री, अश्विन लिलाचंद पाटील यांच्यासह मारवड जि.प.मुलींची शाळा व जवखेडा जि.प.शाळा या दोन आदर्श शाळांचाही सत्कार करण्यात आला.
