बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) माणगांव पंचायत समितीच्या माध्यमातून माणगांव खांदाड येथील शाळेत गुरुवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या आमचं गाव आमचा विकास कार्यशाळेत नवनिर्वाचित आमदार अदितीताई तटकरे यांनी उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केले. त्या आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की, आमचं गाव आमचा विकास सदर विकास आराखडा हा ग्रामपंचायतीला मिळालेला संविधानिक अधिकार आहे. ज्यामुळे आपण आपल्या गावचा सर्वांगीण विकास करु शकतो. गावाचा विकास करण्यात सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सर्व ग्रामस्थ यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार अदिती तटकरे यांनी सन २०२१ ते सन २०२५ या कालावधीचा पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा या विषयपर आयोजित केलेल्या कार्यशाळेत केले.
सन २०२१ ते सन २०२५ या कालावधीचा पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास कार्यशाळा प्रसंगी आ.अदितीताई तटकरे , सभापती सुजीत शिंदे , राजेश पानावकर, सुभाष केकाणे, शैलेश भोनकर, मंगेश कदम ,मुकुंद जाबरे, गट विकास अधिकारी सतीश गाढवे, सहायक गट विकास अधिकारी सौ.नाखले , विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड , विस्तार अधिकारी श्री. मींडे , प्रकल्प अधिकारी, कषि विस्तार अधिकारी बाळकृष्ण काप , कनिष्ठ प्रशासन अधिकारी स्नेहल मोरे मॅडम, ठाकरे मॅडम, पाणी पुरवठा अभियंता श्री. बुटाला व तालुक्यातील सरपंच व उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, केंद्र प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, सर्व खात्यांचे प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित आमदार अदितीताई तटकरे आपल्या मनोगतात पुढे म्हणाल्या की , गावचा विकास करतानां ग्रामस्थांनी आजी , माजी सदस्यानां सुद्धा विश्वासात घेऊन हा विकास आराखडा निर्माण करावा. कारण माजी सदस्यांकडे अनुभव असतो. त्यामूळे त्यांना एकत्र घेऊन विकास आराखडा करण्याची मानसिकता असावी. एकदा आपण लोकप्रतिनिधी म्हणुन निवडून आलो कि आपण त्या भागाचे प्रतिनिधी असतो त्यामूळे ही पंचायत ह्या पक्षाची आहें , त्या पक्षांची आहें अशी मानसिकता न ठेवता ती आपल्या विभागाचीच आहें असे मानून विकास करायला पाहिजे अशी मानसिकता मी बाळगत असुन सर्व लोकप्रतिनिधींनी ही मानसिकता ठेवावी.
छोट्या छोट्या ग्रामपंचायतींना मिळणारा निधी हा खुप कमी असतो आणि तो निधी स्वच्छतेवर जास्त खर्च करवा लागतो. तर यावर उपाय म्हणुन १० ते १२ गावांना एकत्र करून एक क्लस्टर करवा जेणे करून या गावांचा कचरा एका मध्यवर्ती ठिकाणी जमा करावा. जेणे करून या पंचायतीचा खर्च कमी होईल अशी सूचना यावेळी आ. अदिती तटकरे यांनी केली.
माणगाव पंचायत समिती चे गट विकास अधिकारी सतीश गाडवे यांनी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच , ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांना एकत्र बोलाऊन सन २०२१ ते सन २०२५ या कालावधीचा पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा या विषयपर कार्यशाळा आयोजित केली होती.या वेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आराखडा करीताना कोणत्या गोष्टींनां प्राधान्य द्यावे या विषयीची सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेतील उपस्थितांना माणगांव पंचायत समितीच्या माध्यमातून उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी माणगांव पंचायत समितीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेतली.
