Halloween party ideas 2015


थकलेल्या बाबांची करुण कहाणी.....!

दुपारचे दोन वाजलेले होते.कोठलीहुन शहादाला जायला निघालो...दोन्ही बाजूंनी हिरवाईने नटलेला शहादा-शिरपूर रस्ता तसा दुपार असल्याने सामसूम होता. खड्डे टाळत टाळत गाडी धावत होती. या शांत रस्त्यावर अनरद बारीच्या पुढे डाव्या बाजूला एक ऐंशी वर्ष वयाचे आजोबा गाडीला हात देत थांबवतांना दिसले.मात्र गाडी वेगानं असल्यानं पुढं गेलीच..! पांढरंशुभ्र असलेलं मात्र अगरबत्तीच्या ठिणगीमुळे डाग पडलेलं धोतर, एका हातात काठी,दुसऱ्या हातात गाठोडं असलेले हे वयस्कर बाबा दुपारच्या वेळी गाडीला का हात देत थांबवत आहेत.? हा प्रश्न मनाला पडत होता. गाडी वेगानं असल्याने तत्काळ गाडी जागच्या जागी थांबवणे शक्य नव्हते.थोडं वेगानं स्पीड घेऊन शहादाला पोहचावं असा विचार मनात येत होता.मात्र गाडीला हात देणारे ते वयस्कर बाबा नेमकं यावेळी सुन्या रस्त्यावर का थांबले असतील..?बाबांना कुठं जायचं असेल..? बाबा एकतर रागाच्या भरात घरातून बाहेर पडले असतील किंवा बाबा निराधार असतील..? असे अनेक विचार मनाला सतावत होते.साधारण ५००मीटर पुढे अंतरावर गेल्यावर राहवले नाही. गाडीला परत यु टर्न घेतला आणि माघारी बाबाकडे यायला निघालो.
         सुसाट धावणारी गाडी बाबाजवळ येऊन थांबली तसे बाबा दचकले.'बाबा कुठं जायचंय.?' असं विचारताच बाबांनं डोळ्यांकडे पाहत पाहत दचकत हळुवार आवाजात उत्तर दिलं' "मला शहादा बस् स्टँड ला सोडा...." हो! पण बाबा नेमकं शहादा बस स्टँडहुन तुम्हाला नेमकं जायचं कुठं.?विचारायला लागल्यावर बाबा स्वतःच्या गावाचं नाव सांगायला दचकत होते.बाबांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती.बाबाला असंख्य प्रश्न विचारायचे होते..त्यावर काही मार्ग काढू शकतो का.?हेही पडताळून पाहायचं होतं... "बाबा तुमची मुले काय करतात..?आणि तुम्ही या वयात भर दुपारी हायवेवर थांबून कुठं जात आहात बाबा" 'मी विचारलं'..."मला तीन मुली आणि एकलूता एक मुलगा होता...मुलींची लग्न होऊन त्या त्यांच्या माहेरी सुखात नांदत आहेत..'बाबा सांगू लागले'..पण बाबा मुलगा काय करतो..?मी विचारले.....'बाबांच्या डोळ्यात मात्र पाणी तरारले आणि बाबा सांगू लागलें..."एकलुता एक मुलगा होता, त्याला इंजिनियर बनवायचं होतं म्हणून उच्च शिक्षणासाठी त्याला बाहेरगावी शिक्षणाला पाठवलं.त्यासाठी एक एकर शेती मला गहाण ठेवावी लागली  जी नन्तर ती विकण्यात आली...मुलगा इंजिनियर झाला मात्र मित्रांच्या संगतीत त्याला तंबाकू खाण्याचं व्यसन लागलं.त्यामुळे त्याला तोंडाचा कर्करोग जडला.खूप खूप मोठेमोठले दवाखाने फिरलो तरी उपचार झाला नाही.परिणामी उरलेली दोन एकर शेतीही विकायला लागली.मात्र मुलगा वाचला नाही...एकलुता एक मुलगा वारला आणि जमीनही गेली....'बाबा स्वतःची करूण कहाणी सांगत होते'.मग बाबा तुम्ही इथे काय करतात..?' विचारल्यावर बाबांनी उत्तर दिलं की,'समोर मित्तल फायबर नावाची  कम्पनी आहे तिथं मी वाचमन म्हणून काम करतो!' बाबा तुम्ही आणि या वयात वाचमनची ड्युटी.....चोरांनी हल्ला केला तर..?' मी 'विचारलं' बाबांनी दिलेलं उत्तर मात्र विचार करायला लावणारं होतं.' बायकोला हजार रुपयांची दवा लागते तसेच इतर खर्चही लागतो... मग या वयात घरी बसून कोण जेवू घालणार.... चार हजार रुपये पगार मिळतो.त्यात तेलमीठमिरची व्यवस्थित भागतं! जोपर्यंत हात पाय चालतात तोपर्यंत काम करायचं"बाबा सांगत होते.एक वयस्कर माणूस आणि आयुष्याच्या शेवटी त्याला विश्रांती न घेता काम करावं लागतं हे पाहून वाईट वाटत होतं.देशभरात असे कितीतरी निराधार वृद्ध आजोबा मरणयातना भोगत असतील याचा विचारही डोक्यात येत होता. 'बाबा तुम्हाला निराधार योजनेतून पेन्शन मिळत असेल म्हणून शेवटचा प्रश्न विचारला...बाबानी पेन्शन वैगरे काहीच मिळत नाही असं उत्तर दिलं.बाबांना बाईकवर बसवून आम्ही शहादाला जायला निघालो.मात्र बाबांना वयोमांनानुसार बाईकवर बसता येत नव्हते.खड्याचा रस्ता असल्यामुळे बाबा बाईकवरून कोसळतील या भीतीनं गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि   दोंडाईच्याकडून येणाऱ्या रिक्षां/बसला थांबवू लागलो.टमटम रिक्षा आली रिक्षावाल्याला पाच रुपये देऊन बाबांना बस स्टँडला पोहचवा म्हणून सांगू लागलो. बाबा रिक्षात बसले.बाबांनी हात जोडला आणि बाबा निघाले....
       मात्र या गडबडीत बाबांचा पत्ता व नाव विचारायचं मात्र विसरलो.म्हणून रिक्षाच्या मागे गाडी नेऊ लागलो.शहादा बस स्टँडला गाडी पोहचली. बाबा भेटले.बाबांनी गावाचं नाव व पूर्ण पत्ता सांगितला.बाबांना काहीतरी आर्थिक मदत करावी म्हणून ५०० रु.देण्याच्या तयारीत होतो मात्र हे ५०० रु.बाबाला किती दिवस पुरतील ..?त्यापेक्षा शास्वत अशी काय मदत करू शकतो का.?विचार करू लागलो. सरकारची श्रावणबाळ योजना, वृद्ध निराधार योजनापैकी कुठल्या योजनेचा लाभ मिळवून देऊ शकतो का.?याचीही चाचपणी करू लागलो आणि परतीच्या कामाला निघालो.दुसऱ्या दिवशी सकाळी तहसीलदार साहेबांशी चर्चा करून वृद्ध निराधार पेन्शन योजना लागू करण्यासाठी यशस्वी झालो.बाबांना लवकरच पेन्शन योजनेचे पैसे मिळतील याचा आनंद वाटत होता.
       मुलाला खूप शिकवावं, मोठं करावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. त्यासाठी बिचारे आई वडील मिळेल ते कष्ट करून मुलाला वाढवत असतात.मात्र हल्लीच्या काळातले काही तरुण आई वडिलांचे कष्ट विसरून व्यसनाच्या आहारी जातात.आणि जिवानिशी मरतात.आई वडिलांना पोरकं करून जातात.आयुष्याच्या संध्याकाळी विश्रांती घेणाऱ्या बिचाऱ्या आई बाबांवर अशी वेळ येऊ नयेच आणि मुलांनी येऊही देऊ नये यासाठी ही डोळ्यांना दिसलेली सत्यकथा खूप काही विचार करायला लावून गेली.

✍प्रवीण महाजन,पुणे
pravinpune123@gmail.com
Www.yuvakmitra.org

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.