बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) ऐन गटारीच्या सणाच्या दिवशी माणगांव तालुक्यातील खरवली विभागात विद्युत वाहिनीचा खांब पडल्या कारणाने खरवली विभागातील चेरवली, पेण तर्फे तळे, आमडोशी आणि बोरघर या गावातील बत्ती अर्थात लाईट गूल झाली आहे. त्यामुळे या सर्व गावातील तमाम गटारी प्रिय मंडळींच्या उत्साहावर लाईट तथा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने विरजण पडले आहे. लाईट नसल्याने या विभागातील जनतेचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे या विभागातील जनतेला नाहक खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या विभागातील जनतेत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. म्हणून येथील सर्व जनता उपहासाने माणगांव एमएससीबी विभाग झाला स्थूल त्यामुळे ऐन गवारीच्या तोंडावर खरवली विभागातील बत्ती गूल असे अत्यंत संतापाने म्हणताना सर्वत्र दिसून येत आहेत.
संपूर्ण कोकणात दिप अमावस्या अर्थात गटारी सणाच्या दिवशी प्रत्येक घराघरात मटण आणि वड्यांचे जेवण बनवून सण साजरा केला जातो पण या वर्षी या गटारी सणाच्या दिवशीच नेमका विद्युत पुरवठा खंडित झाल्याने प्रत्येक घरातील महिलांना वाटण तयार करण्यासाठी मिक्सर ऐवजी पारंपरिक पाट्याचा आधार घ्यावा लागला या शिवाय ज्या ज्या घरात विद्युत पुरवठ्यावर चालणारे बोअरवेल आहेत अशा घरातील महिलांना गावापासून दूर असलेल्या विहिरीतून भर पावसात भिजत पाणी भरावे लागले तर दुसरीकडे मोठ्या मेहनतीने तयार केलेला स्वयंपाक संपूर्ण कुटुंबा समवेत बसून खायला घरात लाईट नसल्याने तोही धड सुखाने खाता आला नाही घरात लाईट नसल्याने कपड्यांना इस्त्री नाही, मोबाइल चार्जिंग नाही, टिव्ही नाही, वाॅशिंग मशीन नाही, फ्रीझ नाही त्यामुळे सर्व पुरुषांसह तमाम महिला वर्गात एमएससीबी, महावितरण विभागा विषयी तीव्र संताप निर्माण झाला आहे.
संपूर्ण दिवस बिना लाईट काढल्यानंतर पुन्हा रात्री या विभागातील सर्व जनतेला त्याच अवस्थेचा सामना करावा लागला कारण रात्री आता येईल नंतर येईल लाईट असे करता करता संपूर्ण रात्र लोकांना अंधारात चाचपडत मच्छरांच्या रक्त पिपासू त्रासाचा सामना करत काढावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सुद्धा तीच परिस्थिती त्यामुळे आजही सर्व जनता लाईट च्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे एमएससीबी, महावितरण, विद्युत महामंडळ विभागाच्या या गलथान कारभारा विषयी लोकांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कारण पावसाळ्यात हे सर्व प्रकार टाळण्यासाठी संबंधित विभागाच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने पावसाळ्या आधी या सर्व बाबींचा विचार करून असे प्रकार टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे पावसाळ्या आधी विद्युत वाहक तारांना स्पर्श करणारी सर्व झाडे झुडपे आणि वेली वेळीच छाटून टाकल्या पाहिजेत, जे विद्युत पोल तथा खांब फार जीर्ण होवून पडण्याच्या स्थितीत आहेत ते बदलून टाकले पाहिजेत जेणेकरून जनतेला असा नाहक त्रास होणार नाही. परंतु संबंधित विभागा कडून दुर्दैवाने असे होताना दिसून येत नाही. आजही बहुतेक ठिकाणी विद्युत वाहक तारा मोठ्या प्रमाणात झोल खात आहेत तर अनेक ठिकाणी विद्युत पोल पडण्याच्या स्थितीत आहेत याला जबाबदार कोण आहे ? त्यामुळे या विभागातील सर्व जनतेला असे म्हणावे लागत आहे की माणगांव तालुक्यातील एमएससीबी विभाग झाला स्थूल त्यामुळे ऐन गटारी सणाच्या तोंडावर खरवली विभागातील बत्ती गूल.....