जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रोतर्फे १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
स्मार्टफोनच्या अति वापराने कुटुंबातील संवाद हरवत चालला-अनिल बोरनारे
कल्याण (प्रतिनिधी) जगात भारत महासत्ता होण्याच्या दिशेने जात असून यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका मोठी राहणार आहे त्यासाठी मळलेल्या वाटा सोडून नवनवीन क्षेत्रातील संधीचा फायदा घ्या व देशाला महासत्ता बनविण्यात हातभार लावा असे आवाहन भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी केले.
कल्याणमधील जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रोने मोहिंदर सिंग शाळेत आयोजित केलेल्या ६० शाळांमधील शालांत परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रोचे अध्यक्ष नागराजन अय्यर, जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन च्या ललिता वासन, अशोक मेहता, मोहिंदर सिंग चॅरिटेबल ट्रस्ट चे सेक्रेटरी सैनी परमप्रीत सिंग तसेच जायंट्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी, शाळांमधील शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगातील सर्वात जास्त तरुण आज भारतात असून जगाला उद्योगक्षेत्रात लागणारे कुशल तंत्रज्ञान देण्याची कुवत भारतात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून अभ्यासक्रम निवडावा, आपल्यात असणाऱ्या छंदाचे रूपांतर करिअरमध्ये करा, भारतात व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था असून त्यामध्ये प्रवेश घेण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना केले
*स्मार्टफोन पासून लांब राहिल्यास यश*
आज भारतातील विद्यार्थी व तरुण वर्ग स्मार्टफोनच्या अति आहारी गेला असून दिवसातून सरासरी पाच-सहा तास त्यावर वेळ घालवीत आहे. हे विद्यार्थ्यास मारक असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विद्यार्थीदशेत असतांना स्मार्टफोनपासून लांब राहिले तरच तुम्हाला यश मिळेल असा सल्लाही अनिल बोरनारे यांनी देऊन स्मार्टफोनचा वापर न केल्याने नीट परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या जयपूरच्या नलिन खंडेलवालचे उदाहरण दिले. स्मार्टफोनमुळे कुटुंबातील संवादच हरवत चालला असून पालकांनीही घरात गरजेपुरता स्मार्टफोन वापरावा, मुलांचे सर्वच हट्ट पुरविण्यापेक्षा त्यांना नकार पचवायलाही शिकवावे असे आवाहनही बोरनारे यांनी पालकांना केले.