अमळनेर तालुक्यातील जि.प.उच्च प्राथ.शाळा,पिंगळवाडे भरणार थेट मंगळावर....
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथिल डिजिटल, आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांची एकूण 94 नावे जुलै 2020 मध्ये मंगळ ग्रहावर भरारी घेणाऱ्या अवकाशयानाच्या कक्षेत पोहचली आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक तथा तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांनी शाळेतील पदवीधर शिक्षक प्रविण पाटील, उपशिक्षक रविंद्र पाटील व शिक्षिका वंदना सोनवणे यांच्या सहकार्याने NASA च्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी केली आहे.
या उपक्रमांतर्गत जि.प.उच्च प्राथ.शाळा, पिंगळवाडे ता.अमळनेर शाळेतील इयत्ता 1 ली ते 7 वी च्या 90 विद्यार्थ्यांची व 4 शिक्षकांची नावे नोंदवण्यात आली. NASA च्या या जुलै 2020 मध्ये होणाऱ्या "मंगळ मोहिमेत 100% सहभाग नोंदवल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे बोर्डिंग पास प्राप्त झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना एका ऐतिहासिक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अंतरीक्ष मोहिमेत सहभाग घेतल्याचा बहुमान मिळाला आहे.
खेडेगावात मुलांच्या मनात प्राथमिक शिक्षणापासून अवकाश संशोधनाबद्दल माहिती घेऊन त्यांना शालेय शिक्षणाबरोबर नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून आपली नावे मंगळावर पाठवण्याची संधी शिक्षकांनी उपलब्ध करून दिली आहे.
*प्रत्येकाला मिळणार फ्लाईंग मिलियन्स पॉईंट*
नासामार्फत 2020 मध्ये “मार्स रोव्हवर 2020′ हे यान मंगळाचा अभ्यास करण्यासाठी प्रक्षेपित केले जाणार आहे. त्यातील एका चीपवर विद्यार्थ्यांची नावे स्टेन्सिल करून ती मंगळ ग्रहावर पाठविली जाणार आहेत. यासाठी प्रत्येकाला फ्लाईंग मिलियन्स पॉइंट मिळणार आहेत.
*काय आहे नासाची मोहिम?*
अमेरिकेच्या National Aeronautics & Space Administration अर्थात 'नासा' या जगतविख्यात अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचे 'मंगळ रोव्हर 2020' हे अंतरिक्षयान 'लाल ग्रह' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे.
या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेन्सिल्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊल खुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे. ही मोहीम नासाच्या वतीने चांद्र मोहीम ते मंगळ मोहिमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम अंतर्गत राबवत आहेत. पिंगळवाडे येथिल मुलांची नावे 'नासा' च्या अवकाश यानावर झळकणार....
जि.प.पिंगळवाडे शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांची नावे या माध्यमातून मंगळावर पाठवण्यासाठी नोंदवली आहेत. इतर शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा 30 सप्टेंबर 2019 पर्यंत उपक्रमांतर्गत नाव मंगळावर पाठवण्यासाठी mars.nasa.gov या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. नासाच्या पसाडेना, कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या (JPL ) मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरी मध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या (75 नॅनोमिटर) रुंदीत आपण नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे मावतील. ह्या चिप रोव्हर वर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जाणार आहेत.
"आम्ही विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधनाप्रती जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना या नव्या क्षेत्राची प्राथमिक माहिती व्हावी, तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या चिमुकल्यांनी आपली नावे मंगळावर पाठवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच आम्ही विद्यार्थ्यांना नासाच्या व इस्रोच्या चांद्रयान, मंगळयान मोहिमेच्या काही चित्रफिती दाखवून त्यांच्या ज्ञानात भर टाकण्याचा प्रयत्न केला आहे.” असे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी सांगितले.
रोव्हर 2020 हे यान 'ऍटलस V 541 या रॉकेट च्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल इथल्या सैन्य दलाच्या तळावरून 17 जुलै 2020 ते 5 ऑगस्ट 2020 मध्ये लॉन्च केले जाणार आहे जे 2021च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहचण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने बरोबर 1 वर्ष आधी आज दि.17 जुलै 2019 रोजीचे औचित्य साधून शाळेने आपला सहभाग नोंदवत तालुक्यातील पहिली जि.प.ची शाळा ठरली आहे.
सदर उपक्रमासाठी अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, शालेय पोषण आहार अधिक्षक बी.पी.चौधरी, अमळगांव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर व अमळगांव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख भगवान पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
अधिक माहितीसाठी नासाच्या https://mars.nasa.gov/participate/send-your-name/mars2020 या संकेतस्थळाला भेट द्यावी व या संधीचा लाभ घ्यावा असे अावाहन जि.प.उच्च प्राथ.शाळा, पिंगळवाडे ता.अमळनेर जि.जळगाव च्या वतीने करण्यात येत आहे.