पत्रकार सन्मान आणि आरोग्य योजना
जुलैपासून अंमलात आणणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारने मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दर्पणकार बाळाशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी आणखी 10 कोटी रुपयांची केलेली तरतूद आणि पत्रकारांच्या आरोग्य विमा योजनेसाठी अर्थसंकल्पातून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. या दोन्ही योजना जुलैमध्ये अंमलात आणण्याचे आश्वासन देत त्यांनी तसे निर्देश सबंधीतांना दिले.
ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान योजना लागू व्हावी आणि महात्मा फुले जीवनदायी योजनेत पत्रकारांचा समावेश व्हावा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने सातत्याने पाठपुरावा केला होता. आज अर्थसंकल्प सादर होणार असताना सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करुन आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने दोन्ही योजनांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्याने या योजना मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला स्थैर्य देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद केली आहे. आता या योजना जुलैपासून अंमलात आणण्यात येतील. त्याबाबत जर काही तांत्रिक अडचणी असतील तरी त्या दूर केल्या जातील. पत्रकारांच्या अन्य विषयांवरही राज्य सरकार सकारात्मक आहे. वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
यावेळी उपाध्यक्ष दिपक भातुसे, कार्यवाह विवेक भावसार, कोषाध्यक्ष महेश पावसकर, कार्यकारिणी सदस्य अनिकेत जोशी, खंडूराज गायकवाड, कमलेश सुतार, सचिन गडहिरे उपस्थित होते.
......................................................