सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असा नामविस्तार केल्याने छगन भुजबळ यांच्याकडून सरकारचे आभार
सोलापूर प्रतिनिधी
राज्यातील विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे - छगन भुजबळ*
राज्यातील प्रत्येक विद्यापीठ हे मुंबई व पुणे विद्यापीठाप्रमाणे स्वयंपूर्ण करून राज्यातील सर्वच विद्यापीठांचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. सोलापूर विद्यापीठाचे नामविस्तार करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आज सभागृहात मांडण्यात आला होता. त्यावर छगन भुजबळ यांनी या ऐतिहासिक विधेयकाला आपला पाठींबा जाहीर करत सभागृहाने हे विधेयक मंजूर करावे असे आवाहन त्यांनी केले.
सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे या विधेयकावर बोलतांना छगन भुजबळ म्हणाले कि, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्यात यावे ही बऱ्याच वर्षांची मागणी होती. यामागे अनेक लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.त्यामुळे सरकारकडून सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांच्या नाव देण्यात येत आहे. ही अत्यंत गौरवाची बाब असून त्याबद्ल सरकारचे आभार व्यक्त केले.
ते म्हणाले कि, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या कुठल्याही एका समाजाच्या नव्हत्या त्यांनी त्या काळात महिला राज्यकर्त्या म्हणून पुढे येत समाजातील लोकांच्या गरजा लक्षात घेत अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी केली आहे. त्यांनी केलेली कामे आज देखील इतिहासाची साक्ष देता आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याप्रमाणे विद्यापीठाचा कारभार होणे गरजेचे असून मुंबई, पुणे या विद्यापीठांप्रमाणे राज्यातील सर्वच विद्यापीठांचा दर्जा वाढविण्याची गरज असून सर्वच विद्यापीठे ही स्वयंपूर्ण झाली पाहिजे अशी मागणी करत या विधेयकाला पाठींबा देत हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले.