नांदेड प्रतिनिधी
- नानक साई फाऊंडेशनच्या 'संत नामदेव घुमान यात्रेला' हरियाणा चा पानिपत शौर्य तीर्थ पुरस्कार जाहीर झाला आहे.
हरियाणा पानिपत येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वेलफेअर संघाचे वतीने हा पुरस्कार दिला जाणार आहे. संघाचे अध्यक्ष डॉ. राजबिर दाभाडे व सचिव भाई जगिर सिंह यांनी या पुरस्काराची घोषणा केली. नांदेड येथील नानक साई फाऊंडेशन तर्फे दरवर्षी संत नामदेव महाराज यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने श्री हजूर साहिब नांदेड ते अमृतसर अशी घुमान यात्रा आयोजीत केली
जाते. पंजाब व महाराष्ट्र राज्यात नानक साई फाऊंडेशन व घुमान यात्रेच्या माध्यमातून बंधूभाव व सांस्कृतिक देवाण घेवाण करण्यात ही चळवळ यशस्वी ठरली आहे. यासाठी पानीपत येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वेलफेअर संघाने हा पुरस्कार जाहिर केला आहे. नानक साई फाऊंडेशन चे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवते.
संत नामदेव महाराज यांचा ७४९ वा जन्म उत्सव यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी घुमान येथे मोठ्या स्वरूपात साजरा केला जात आहे. त्या दरम्यान पानीपत येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. लंगर साहिब गुरुद्वारा चे मुख्य जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ जी एवं संत बाबा बालविंदरसिंग जी यांचा नानक साई च्या या उपक्रमांना कृपा आशीर्वाद लाभलेला आहे. यावर्षीची घुमान यात्रा 3 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे असे यात्रेचे मुख्य संयोजक पंढरीनाथ बोकारे यांनी सांगितले.