बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद लाख मोलाचे समाधान देतो - आचार्य के बी रणधीर
जि प प्राथ शाळा धाबे येथे शैक्षणिक साहित्य वाटप
अमळनेर प्रतिनिधी
दि १९ आज जि प प्राथमिक शाळा धाबे ता पारोळा येथे श्री क्षेत्र शिवशक्ती बहुउद्देशिय संस्था बहादरपूर ता पारोळाचे संस्थापक आचार्य मा के बी रणधीर बाबा, त्यांच्या धर्मपत्नी संस्थेच्या अध्यक्षा सौ शैलाताई रणधीर व संस्थेचे उपाध्यक्ष सागर रणधीर यांनी शाळेला भेट दिली व विदयार्थ्यांना आश्चर्ययुक्त आनंद मिळुन दिला. त्यांनी शाळेच्या सर्व विदयार्थ्यांना मार्गदर्शन तर केलेच पण ५५ विदयार्थ्यांना पाटी, प्रत्येकी दोन वहया, पेन, पेन्सिल, शॉपर्नर, खोडरबर, पाटी पेन्सिल पुडा असा संच करुन प्रत्येक विदयार्थ्याला वाटप केला. गरीब गरजु आदिवासी बालके या भेटीमुळे व शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच हे शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे खुपच आनंदित झाली.
आचार्य रणधीर बाबा, सौ शैलाताई रणधीर व सागर रणधीर यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे, वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील, शाळा व्यवस्थापन सदस्या रत्नाबाई भिल यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन केले.
या वेळी गुणवंतराव पाटील यांनी आचार्य रणधीर बाबांचा परिचय करतांना सांगितले की ते नुकतेच पाटबंधारे खात्यातुन कालवा निरीक्षक म्हणुन निवृत्त झाले असुन त्यांचे आध्यात्मिक कार्य व सामाजिक कार्य महान आहे. दहा बारा राज्यात त्यांचे कार्य असुन मोठा भक्त परीवार आहे. अनेकांना व्यसनमुक्त करुन त्यांनी जीवनात परत आणले असुन पाण्याचा स्रोत, पाणी बचत, पाणी आडवा पाणी जिरवा बाबत खुप मोठे कार्य आहे. जात धर्म विरहित सर्वधर्म समभावाने ते नेहमी कार्य करीत असतात. श्री क्षेत्र शिवशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन अनेक सामाजिक कार्य ते स्वखर्चाने करीत असतात. दरवर्षी पाच सात मोठ मोठया शाळेतील सर्वच विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम ते नियमित राबवित आहेत. त्यांच्या कार्याची दखल सर्वच स्तरातुन घेतली गेली असुन राज्य व राष्ट्रीय स्तरावर २००पेक्षा जास्त, महाराष्ट्र शासनाचे १० व आंतरराष्ट्रीय ३ मानाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या धर्मपत्नी सौ शैलाताई रणधीर सुद्धा त्यांच्या कार्यात पुर्णवेळ हिरीरीने भाग घेतात.
या प्रसंगी आचार्य रणधीर बाबा म्हणाले मला आज या शंभर टक्के आदिवासी बालकांच्या शाळेत येवुन खुप आनंद झाला. मदतीची खरी गरज या बालकांना आहे. शैक्षणिक साहित्य मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद मला लाख मोलाचा व समाधान देणारा आहे. यापुढेही गरज पडली तर या बालकांच्या मदतीसाठी मी आनंदाने तयार आहे.
सूत्रसंचलन व आभार मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी मानले.