शिक्षणमंत्री शेलार यांचे आश्वासन, संगीता शिंदे यांचे उपोषण मागे
जुन्या पेंशनसाठी समितीचे गठन, विधीमंडळासमोर ठेवणार अहवाल
शिक्षक आमदार ना.गो.गाणार, कपिल पाटील, अनिल सोले यांच्या मध्यस्थीने तिढा सुटला
मुंबई प्रतिनिधी
शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी 18 जून 2019 पासून मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.आशिष शेलार यांनी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यात राज्यातील शिक्षक आाणि पदवीधर आमदारांसह शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकार्यांचा समावेश राहणार आहे. या समितीचा अहवाल विधीमंडळासमोर ठेऊन त्याला मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्यासंदर्भात संगीता शिंदे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला यश आले असून राज्यभरातील हजारो शिक्षकांमध्ये त्यामुळे आनंदाची लाट पसरली आहे. शिक्षणमंत्री शेलार यांनी संगीता शिंदे यांना ताक पाजून उपोषण संपविले आहे. यामध्ये शिक्षक आमदार ना.गो.गाणार, कपिल पाटील तसेच अनिल सोले यांनी मध्यस्थी करून चर्चा घडवून आणत शिक्षकांचा हा मोठा प्रश्न सोडविला आहे*.
*18 जूनपासून सुरू झालेल्या आमरण उपोषण आंदेालनातील शिक्षकांची स्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याने राज्य सरकारवर चांगलाच दबाव वाढला होता. तसेच सोमवारी जवळपास 8 ते 10 हजार शिक्षकांचा जमाव आझाद मैदानावर संगीता शिंदे यांच्या नेतृत्वात एकत्रित आला होता. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात आज त्यांच्या दालनात शिक्षण संघर्ष संघटनेच्या पदाधिकार्यांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यात त्यांनी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनीच पेंशन योजना लागू करण्याची हमी दिली असून त्यासाठी विशेष समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.*
*जीपीएफ कपात बंदीचा आदेश रद्द*
*1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या अंशत: अनुदानित , विनाअनुदानित शिक्षकांना जुन्या पेंशन योजनेपासून डावलून त्यांना नवीन पेंशन योजना सरकारने लागू केली होती. याविरोधात न्यायालयाने विरोधात निर्णय दिल्यानंतर संगीता शिंदे यांनी सरकारविरोधात बंड पुकारत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची धग संपूर्ण राज्यभर पसरली होती. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढल्याने आज अखेर शिक्षणमंत्री शेलार यांनी संगीता शिंदे यांच्याशी बराच वेळ चर्चा करून त्यावर तोडगा काढला आहे. यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांची जीपीएफ कपात बंद करण्याचा प्रशासनाने काढलेला आदेश रद्द करण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता या शिक्षकांची तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांची जीपीएफ कपात पूर्ववत होणार असून त्यांना आता जुन्याच पेंशन योजनेचा लाभ मिळणार आहे*
*शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याची ग्वाही*
*शिक्षकांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचे आश्वासन शेलार यांनी बैठकीत दिले. यावेळी शिक्षण संघर्ष संघटनेची मागणी मान्य करून संगीता शिंदे यांचे उपोषण शिक्षणमंत्री शेलार यांनी सोडविले आहे. यावेळी बैठकीनंतर शिक्षकांनी आझाद मैदानावर जल्लोष देखील साजरा केला आहे. समितीचे काम लवकरच सुरू केले जाणार असून समितीने दिलेला अहवाल विधीमंडळसमोर ठेऊन त्याला मंजुरी देण्याची कार्यवाही केली जाईल असे शेलार यांनी बैठकीत सांगितले आहे. या बैठकीला शिक्षण संघर्ष संघटनेचे पदाधिकारी श्री नितिन गुडधे पाटील,श्री सुनील भोर सर,श्री अशोक भराड सर,श्री महेंद्र हिंगे,श्री शरद तिरमारे,श्री सचिन पगार,सौ पुष्पां चौधरी व मोठ्या संख्येने उपस्थित होते
अशी माहिती जुनी पेन्शन संघर्ष समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील यांनी एका पत्रकाद्वारे दिली