आयपीएलचे तेरावे सत्र तेराच्या फेऱ्यात अडकणार ?
तेरा या अंकाला क्रिकेटमध्ये अशुभ मानतात. तेरा धावांवर बाद झालेल्या खेळाडूंची संख्या क्रिकेट मध्ये मोठी आहे. क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू होते व सध्याही आहेत की ते तेरा या अंकाला अशुभ समजतात. याला अंधश्रद्धेचा भाग म्हणायचा तर ज्या खेळाडूंना हा अनुभव आला ते याला अंधश्रद्धा मानायला तयार नसतात.
सन २०२० हे इंडियन प्रिमियर लिगचे तेरावे वर्ष. मार्च - एप्रिल - मे हा गेले बारा वर्ष आयपीएलचा नियोजित कार्यक्रम असतो. मात्र यंदा सन २०२० च्या सुरुवातीपासूनच कोविड-१९ म्हणजे कोरोना व्हायरसने जगभर हाहाकार माजवला असताना संपूर्ण जगातले जनजीवन ठप्प झाले होते. जगातला प्रत्येक घटक लॉक डाऊनमुळे घरबंद होता. त्यामुळे क्रिकेटही किटबॅगमध्ये लॉक झाले होते. या लॉकडाऊनमुळे साहजिकच आयपीएलही स्थगित करण्याशिवाय बीसीसीआय समोर पर्याय नव्हता.
जगातील बऱ्याच देशात मोठया लॉकडाऊन नंतर तेथील कोरोना व्हायरस पेशंट कमी होत गेले. मात्र या उलट परिस्थिती भारतात उद्भवली. लॉक डाऊन नतंर भारतात रुग्णांची संख्या रोज वाढतच गेली. त्यातच आयसीसीने ऑक्टोबर - नोव्हेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होऊ घातलेली टि -२० विश्वचषक स्पर्धा रद्द केल्याने आयपीएल स्पर्धा होण्याची शक्यता वाढली. त्या संधीचा फायदा बीसीसीआय न घेते तर नवलच ठरले असते. भारतातील कोविड -१९ ची बिघडत चाललेली परिस्थिती बघता बीसीसीआयने आयपीएलचे तेरावे सत्र परदेशात घेण्याचे ठरविले. संयुक्त अरब अमिरात ( युएई ) च्या रूपात त्यांना सक्षम पर्यायही सापडला. बीसीसीआयच्या फेव्हर मध्ये असलेल्या केंद्र सरकारने त्यांना हिरवा कंदिल दिल्याने आयपीएल होण्याचे मार्ग मोकळे झाले. १९ सप्टेंबर २०२० हा मुहूर्तही त्यासाठी बीसीसीआयने निश्चित केला.
एक संकट दूर होताच दुसरे संकट आ वासून उभे राहीले. चिनशी बिघडलेल्या संबंधानंतर भारतातील अनेक सामाजिक संस्था व क्रिकेटप्रेमींनी चायनीज प्रायोजक विवोच्या प्रायोजकत्वावर आक्षेप घेत बहिष्काराची घोषणा करताच बीसीसीआयने तडकाफडकी निर्णय घेत विवोला यंदाच्या वर्षासाठी आयपीएल प्रायोजकत्वातून मुक्त केले. त्यानंतर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला.
यानंतर बीसीसीआयने कडक नियमावली करून सर्व फँचाईसीजना सक्त अंमलबजावणीचे आदेश दिले. भारतातील वाढत्या कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेता कोणत्याही फँचाईसीजनी भारतात सराव शिबीर न घेण्याचे स्पष्ट आदेश बीसीसीआयने देऊनही चेन्नई सुपर किंग्ज सारख्या नामवंत संघाने या सुचनेचे उल्लंघन करून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. याच चेन्नई संघाचे तेरा सदस्य कोविड -१९ चे पॉझिटिव्ह सापडले. त्यामध्ये त्यांचा प्रमुख जलदगती गोलंदाज दिपक चहार व तडाखेबाज महाराष्ट्रीयन फलंदाज ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे.
हे कमी की काय म्हणून चेन्नईच्या संकटात आणखी भर पडली. चेन्नईचा सुपरस्टार खेळाडू सुरेश रैना त्याच्या नात्यातील व्यक्तीची हत्या झाल्याने मायदेशी परतला. वास्तविक रैना संघात पसरलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येमुळे मायदेशात पसरल्याची खरी खबर आहे. रैना फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व अनुभव या क्षेत्रात महत्वाचा खेळाडू असल्याने त्याची उणीव चेन्नईसाठी सर्वात मोठी धक्कादायक बाब आहे.
चेन्नईच्या ४५ जणांच्या चमूत १३ जण पॉझिटिव्ह आढळल्याने व रैना संघ सोडून भारतात परतल्याने सीएसकेच्या गोटात चलबिचल नक्कीच झाली असणार. चेन्नईचा संघ यंदाचा संभावित विजेता असल्याने या उद्भवलेल्या परिस्थितीने त्यांच्या अभियानाला धक्का बसला असून वरकरणी सर्व अलबेल दिसत असलं तरी खेळाडूंमध्ये भितीचं वातावरण आहे. अर्थात याला जबाबदार संघ प्रबंधनच आहे, की ज्याने बीसीसीआयच्या नियमांचे पालन केले नाही.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज सलामीवीर युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल विंडीजहून थेट युएईत आल्या नंतर त्याने क्वारंटाईन होणे गरजेचे असताना हा पठ्ठया सारे नियम धाब्यावर बसवून जाहीरातीच्या शुटींगला १० ते १५ अनोळखी कलाकारात मिसळतो हे त्याच्या व संघाच्या आरोग्या साठी नक्कीच धोकादायक असून हे थेट यमदेवालाच खुलेआम आव्हान नाही का ? तेंव्हा अश्या मुजोर खेळाडूला वेळीच त्याची जागा बीसीसीआयने दाखविण्याची गरज आहे. नाहीतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत जाऊन आयपीएलचे तेरावे सत्र संकटात सापडू शकते.
वरील सर्व बाबी व खेळाडूंचे बेताल वागणे व सुरक्षेचे नियम न पाळणे आयपीएलच्या तेराव्या सत्राला तेराच्या फेऱ्यात अडकविणार तर नाही ना ? असे प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही.
लेखक : -
डॉ. दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
