शिक्षकदिनाचे महत्त्व.
गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाची परंपरा आहे.आपल्या आयुष्यात आईवडिलांची जागा कोणीही भरु शकत नाही, कारण या सुंदर जगात आपल्याला आणण्याचे श्रेय त्यांना आहे, त्यामुळे आपले पहिले गुरु तेच आहे. भारतात प्राचीन काळापासून गुरू-शिष्य परंपरा असून शिक्षक हे आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दाखवून योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात.
दरवर्षी ५ सष्टेंबर या दिवशी "शिक्षकदिन" साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो.प्रत्येकांच्या जीवनात गुरुला एक विशिष्ट स्थान असते. समाजात शिक्षकांना एक मानाचा दर्जा दिला आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सष्टेंबर १८८८ मध्ये मद्रासमधील तिरुराणी येथे झाला. ते ब्राह्मण कुळातील असल्याने त्यांच्या घरात नेहमी धार्मिक विधी केला जात असे. आणि या अशा धार्मिक वातावरणात ते लहानाचे मोठे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी मँट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली."तत्त्वज्ञान" हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी या विषयात पदवी घेऊन मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी केली. परंतु नोकरी करत असताना सुद्धा त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी " वेदांतातील नीतीशास्त्र " या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या प्रबंधास विद्यापीठाने "सर्वोत्तम प्रबंध " म्हणून जाहीर करुन त्यांचा गौरव केला. कुशल व्यक्तीमत्त्व व इंग्रजी भाषेवर असलेल्या त्यांच्या प्रभुत्वामुळे त्यांची प्रशंसा परदेशातसुद्धा झाली. आँक्सफर्ड विद्यापीठात ही ते नीतीशास्त्राचे प्राध्यापक होते.
शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक ,इंजिनिअर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळयाला कुंभार आकार देऊन एखादी मूर्ती बनवतात त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य ते संस्कार करुन त्यांना भविष्यातील एक जबाबदार नागरिक बनवण्याचे काम करतो. त्यामुळे आईवडिलांप्रमाणे शिक्षक सुद्धा हे आपले अप्रत्यक्षरीत्या पालक असतात.आज शिक्षणाचे अवमूल्यन केले जात असल्याचे चित्र समाजात दिसत आहे. तसेच गुरु-शिष्य संबंधामधील पवित्र भावना लोप पावत आहे. या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी आणि डॉ. राधाकृष्णन् यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.
शिक्षक हे केवळ आपल्याला पुस्तकी ज्ञान शिकवत नाही तर ते आपल्याला समाजात जगण्याची कला शिकवत असतात.आपल्या व्यक्तीमत्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरीती व आदर असे पैलू पाडले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षकदिनी आदर व्यक्त करुन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अशा या शिक्षकदिनी माझ्या आयुष्यातील सर्व गुरुजनांना मनापासून नमस्कार.
लेखिका
प्रा.अमिता कदम.
(Venus World School)
हडपसर
पुणे.
9819395788.