ख्राईस्टचर्चच्या हिरव्या लसलसीत गालीच्या सारख्या हेगले ओव्हलवर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत सुरू असलेल्या कसोटी मालिकेअंतर्गत यजमान न्युझिलंडविरूध्दच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी हाराकीरी करून आपल्या अडचणीत स्वतःच वाढ करून घेतली. पहिल्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर आपली अब्रू वाचविण्याची कठीण जबाबदारी भारतीय संघावर होती. याचं कारण आपल्याला माहीतीच आहे की भारतीय संघ सध्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत आघाडीवर आहेच शिवाय सध्या कसोटीचा विश्वविजेताही आहे.
न्यूझिलंड दौऱ्यातील टि-२० मालिकेतील निर्भेळ यशानंतर क्रिकेटपंडित व चाहत्यांनी अश्याच घवघवीत यशाची अपेक्षा वनडे व कसोटी मालिकेतही भारतीय संघाकडून धरली होती. परंतु एखादयाची दृष्ट नजर लागावी अशी वाईट कामगिरी वनडे व कसोटीत भारतीय संघाकडून घडत आहे. वनडे मालिकेत फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात भारताचे बुरुज कोसळले होते. त्यानंतर पहिल्या कसोटीत तर भारत आपल्या लौकिकाप्रमाणे एक टक्काही खेळला नाही.
याच अपयशाच्या धर्तीवर भारत दुसऱ्या कसोटीसाठी तयार झाला. पण तेथेही " प्रथम ग्रासे मक्षीपःत " या उक्ती प्रमाणे नाणेफेक विरोधात पडली व भारताच्या घरघरीला पुन्हा सुरूवात झाली. पहिल्या कसोटीतील अपयशी फलंदाज पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा व हनुमान विहारीने बॅट तळपवली खरी पण असली वार करायची वेळ आली तेंव्हा ते ती म्यान करुन निघून गेले. नंतर बाकीच्या फलंदाजांनी पाठशिवणीचा खेळ करण्यातच धन्यता मानली. एकवेळ ३५० धावांचा टप्पा समोर दिसत होता, पण अखेर तो २५० ही गाठू न शकल्याने पुढचे कार्य आणखीच कठीण बनले. पहिल्या दिवशी राहिलेल्या वेळात किवीज फलंदाजांनी खबरदारी घेत कोणतीही पडझड होऊ न देता खिंडार सांभाळत अर्धशतकी मजल मारली.
दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होताच मरगळ आलेला भारतीय गोलंदाजांचा ताफा सरसावला व त्यांनी आश्चर्यकारकरित्या न्यूझिलंडचा डाव गुंडाळून भारताला सात धावांची का होईना मानसिक आघाडी मिळवून दिली. आता त्यावर कळस चढविण्याचे काम फलंदाजांचे होते पण मायदेशात फिरकीला धार्जीण्या, पाटा खेळपट्टयांवर पाहुण्या गोलंदाजांवर पिसाळलेल्या वाघासारखा हल्ला करणारे भारतीय फलंदाज येथे मात्र न्युझिलंडच्या धारदार गोलंदाजीसमोर लेंडाळ कुत्र्यासारखे शेपूट घालून एकामागोमाग पळत सुटले. यामध्ये जगातला सर्वोत्तम गणला जाणारा फलंदाज व संघनायक विराट कोहलीही होता. कोहलीचा दरारा या दौऱ्यात न्यूझिलंडच्या गोलंदाजांनी मोडीत काढत या दौऱ्यात त्याची पुरती धिंड काढली. साहजिकच त्याचा परिणाम इतर फलंदाजांच्या कामगिरीवर होणार होताच व झालेही तसेच. इतर कोणताच फलंदाज कामगिरीत सातत्य न राखू शकल्याने संघाच्या अडचणीत वाढच झाली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा चार फलंदाज शिल्लक आहेत. त्यापैकी हनुमान विहारी, रविंद्र जडेजा व बिन भरवशाचा रिषभ पंत काय चमत्कार करतात यावरच भारताचं भवितव्य अवलंबून आहे. ९७ धावांच्या आघाडीत अजून ५० ते ७५ धावांची भर जरी त्यांनी घातली तर भारताचे गोलंदाज जादू करू शकतात. परंतु न्युझिलंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजांना एवढी ढिल देतील असे वाटत नाही. पण शेवटी आशावाद व प्रयत्न शेवटपर्यंत जीवंत ठेवला तर काहीही शक्य आहे. कदाचित हा लेख तुमच्या हाती पडेपर्यंत सामन्याचा निकालही लागलेला असेल.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
