रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्याची प्रशासकीय धुरा सांभाळणाऱ्या सर्व महिला शक्तीला महिला दिनानिमित्त सन्मानपूर्वक शतशः प्रणाम!
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) जागतिक स्तरावर महिलांनी स्वतः च्या हक्कासाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याच्या स्मरणार्थ भारतासह संपूर्ण जगात ०८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी म्हणजे २८ फेब्रुवारी १९०९ साली अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात सर्व प्रथम महिला दिन साजरा करण्यात आला. असे असले तरी १९१० साली आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनेनुसार ०८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. त्या काळात पुरुष प्रधान संस्कृतीने विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत महिलांना अर्थात स्त्रियांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले होते. क्लारा झेटकी या कम्युनिस्ट महिला कार्यकर्तीने स्त्रियांना सार्वत्रिक मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे आद्य कर्तव्य आहे. अशी घोषणा केली. या घोषणेनंतर ०८ मार्च १९०८ रोजी न्युयॉर्क शहरातील रुटगर्स चौकात वस्त्रोद्योग क्षेत्रातील हजारो महिला कामगारांनी ऐतिहासिक निदर्शने केली या ऐतिहासिक क्रांतीच्या स्मरणार्थ ०८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला.
पुढे भारतात स्त्रीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा फुले आणि ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले यांनी विषमता वाद्यांच्या अनन्वित अत्याचाराला भीक न घालता पुण्यात सर्व समाज घटकातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी भारतातील पहिली शाळा काढली आणि समाजातील अनिष्ट रूढी आणि परंपरांच्या जुलमी श्रृंखला तोडून स्त्रियांना शिक्षण देऊन शिक्षित केले. या नंतर विश्वरत्न महामानव, बोधिसत्व, विद्येचे महामेरू समतेचे पुरस्कर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील तमाम स्त्रियांना सर्वार्थाने स्वातंत्र्य प्रदान करण्यासाठी भारतीय संविधानाच्या माध्यमातून कायद्याची कवचकुंडले बहाल केली. आणि सर्व स्त्रियांना मनुवादाच्या युगानुयुगाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले.
त्यामुळे भारतातील पुरुषप्रधान मक्तेदारी संपुष्टात आली आणि सर्व समाज घटकातील सर्व स्त्रियांना घटनात्मक आरक्षण दिल्यामुळे त्यांना आपल्या बुद्धी कौशल्यावर सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा संविधानिक अधिकार प्राप्त झाला.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या कायदेशीर अधिकारांमुळे भारतातील स्त्रिया
आज देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होताना दिसत आहेत. संविधानिक अधिकारामुळे सर्वच क्षेत्रात महिला संपूर्ण भारता प्रमाणे रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्याच्या प्रशासकीय धुरा अत्यंत सक्षमपणे आणि जबाबदारीने सांभाळत आहेत. या मध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्याच्या सर्वात तरुण महिला पालकमंत्री नामदार माननीय अदितीताई तटकरे मॅडम, रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती तळा तालुक्यातील तळेगांव च्या माननीय गिताताई जाधव मॅडम, माणगांव तालुक्याच्या प्रांत माननीय प्रशाली जाधव- दिघावकर मॅडम, माणगांव तहसीलदार माननीय प्रियांका आयरे मॅडम, माणगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माननीय योगिता चव्हाण मॅडम आणि सर्व माननीय महिला नगरसेविका आपापल्या शासकीय, प्रशासकीय पदांचा आणि कामकाजाचा कार्यभार अत्यंत जबाबदारीने आणि सक्षमपणे सांभाळून राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देत आहेत. त्या सर्व नारी शक्तीला अथवा महिला शक्तीला जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानपूर्वक शतशः प्रणाम !
शुभेच्छुक
मुख्यसंपादक
बातमी गावाकडची न्युज पोर्टल अमळनेर
विश्वास गायकवाड
माणगांव विशेष प्रतिनिधी
