Halloween party ideas 2015


नियम व नियतीचा फटका इंग्लंडलाही बसलाच !
ऑस्ट्रेलियात महिलांची टि-२० विश्वचषक स्पर्धा सुरू असून ती अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. भारताने आपल्या गटातील सर्वच्या सर्व चारही सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले व सलग तिसऱ्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत भारताची गाठ होती ब गटातून दुसऱ्या क्रमाने उपांत्य फेरी गाठणाऱ्या इंग्लंडशी.
कागदोपत्री प्रबळ वाटणारा इंग्लंडचा संघ या सामन्याचा संभावित विजेता म्हणून गणला जात होता. कारण त्यांना विश्वचषका सारख्या मोठया व तणावाच्या सामन्यात खेळण्याचा पुर्वानुभव होता. भारताचा संघ या स्पर्धेत अजय असला तरी भारताच्या यशाविषयी अनेकांच्या मनात शंका होती. परंतु या वेळेस नियतीच्या मनात वेगळेच विचार होते.
ज्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर उपांत्य फेरीचे जे दोनही होते तेथे पूर्वीपासूनच पावसाचे सावट होते आणि झालेही तसेच. पहिला सामना भारत व इंग्लंड यांच्यात होता. आयसीसीच्या नियमाप्रमाणे हा सामना निकाली निघण्यासाठी कमीत कमी १० -१० षटकांचा होणे गरजेचे होते. परंतु पावसाने सामना होण्याची प्रत्येक संधी थेंबाथेंबाने धुवून टाकली, आणि याच बरोबर टि २० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच पोहोचण्याचे भारतीय संघाचे स्वप्न साकार झाले व इंग्लंडचे स्वप्न त्या पावसाच्या पाण्यात वाहून गेले.
जागतिक स्पर्धेसारख्या महत्वाच्या सामन्यात नॉकआऊट सामन्यासाठी राखीव दिवस असायलाच हवा. आयसीसी आपल्या वेगवेगळ्या स्पर्धात वेगवेगळे नियम लावते ही न समजण्या पलीकडची बाब बनली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या जुन- जुलै २०१९ च्या पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य व अंतिम फेरीसाठी राखीव दिवस होते. आपल्याला आठवतच असेल या राखीव दिवसामुळेच भारताला पराभूत व्हावे लागले होते. भारताने सामन्याच्या मूळ दिवशी न्यूझिलंडला २३८ धावांत रोखले. त्यानंतर पावसाने व्यत्यय आणला व दुसऱ्या राखीव दिवशी सामना नव्याने न होता केवळ भारताची फलंदाजी झाली. त्या नव्या दिवशी पावसाने प्रभावित केलेल्या खेळपट्टी व वातावरणाचा अचूक लाभ न्यूझिलंडच्या गोलंदाजांनी घेत भारताला १८ धावांनी हरवून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत इंग्लंड - न्यूझिलंड लढतीत सामना टाय झाला, नंतर सुपर ओव्हरचा खेळही टाय झाला. अधिक चौकार -षटकार मारण्याच्या निकषावर इंग्लंडला विजेता ठरविण्यात आले. वास्तविक आयसीसीच्या या अन्यायकारक नियमाने न्यूझिलंडला न हरताही पराभूत व्हावे लागले. मग त्यानंतर झालेल्या मोठया काथ्याकुटीनंतर आयसीसीने आपला सुपर ओव्हरचा नियमच बदलून अशा परिस्थितीत थेट निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हरचा उपयोग करायचा नवा नियम बनविला.
महिलांच्या या चालू असलेल्या स्पर्धेत उपांत्य सामना न खेळताच इंग्लंडला पराभूत व्हावे लागले. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. परंतु नियम सर्वांसाठी सारखेच असल्याने व स्पर्धेपूर्वीच इंग्लंडसह सर्वच संघाच्या क्रिकेट बोर्डाने मान्यता दिल्याने इंग्लंडने खेद मानण्याचे कारणच नाही. कारण याच नियमांमुळे सन २०१९ चा विश्वकरंडक त्यांच्या पुरूषांना जिंकता आला. तसेच १९९२ विश्वकरंडकांच्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सफसेल पराभवाच्या छायेत असताना आलेल्या पावसाने व आयसीसीने बनविलेल्या चुकीच्या नियमामुळे इंग्लंडला विजय मिळून अंतिम सामन्याचं तिकीट मिळाले. पुढे जात पाकिस्तानने त्यांना हरवून विश्वकरंडक पटकाविला हा भाग वेगळा. पण नियमांचा लाभ इंग्लंडला झाला हे मात्र नक्की !
त्या उपांत्य सामन्यात पाऊस येण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला १३ चेंडूत २२ धावा हव्या होत्या. पावसाच्या व्यत्ययानंतर द. आफ्रिकेला विजयासाठी नवे लक्ष्य होते एका चेंडूत १३ धावा ! आता सांगा हा द. आफ्रिकेवर अन्याय नव्हता का ? शेवटी नियमानुसार द.आफ्रिकेने पराभव मानलाच ना ? मग आता इंग्लंड संघाने आकांडतांडव करण्याची गरजच नाही. पराभव मान्य करून त्यांनी या सभ्य गृहस्थांच्या या खेळात खिलाडूवृत्ती दाखवावी यातच इंग्लंडचे मोठेपण सिध्द होईल. नाहीतर केवळ स्वतःचा फायदा होणारे नियम बनविण्यास आयसीसीला भाग पाडायचे या इंग्रंजांच्या कुटनितीला काही अर्थ उरणार नाही.
आयसीसी आता आपल्या काही नियमांचे अवलोकन करून त्यात बदल करेलच पण शेवटी नियती प्रत्येक गोष्टीचा कधी ना कधी सूड उगवतेच हे मात्र त्रिकलाबादीतील अगाध सत्य आहे.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.