सातवा वेतन आयोग लागू होणार
निरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांची माहिती
मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे दिली.
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, निरंजन डावखरे, नागो गाणार, विजय गिरकर, अनिल सोले यांनी नियम ९३ अन्वये हा मुद्दा विधान परिषदेत मांडला. त्यावेळी राज्य सरकारकडून लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली असल्याचे भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.
राज्यात अनुदानित समाजकार्य महाविद्यालये आहेत. राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण आणि शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र, समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळालेला नाही, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले. या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचा मुद्दा आमदार डावखरे यांनी मांडला. या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
`सध्या ४९ अनुदानित समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनासाठी अनुदान दिले जाते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार समाजकार्य महाविद्यालयासाठी कर्मचारीवृंद निश्चित केला असून, या महाविद्यालयात ५०९ शिक्षक व ६१७ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उच्च-तंत्र शिक्षण विभागाच्या धर्तीवर १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगाची सुधारीत संरचना लागू केल्यास वेतनापोटी शासनावर १६ कोटी ७५ लाख ३२ हजार ४७० कोटी रुपयांच्या वाढीव निधीची आवश्यकता आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तो लवकरच लागू करण्यात येईल, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.
