पारोळ्याचे शंकर उर्फ बापू कुंभार यांचे दातृत्व
मार्च महिन्यात येणाऱ्या जागतिक वन्यजीव दिन, जागतिक चिमणी दिन, जागतिक वन दिन, जागतिक जल दिन, जागतिक हवामान दिन निमित्ताने विदयार्थी व ग्रामस्थांमध्ये जागृती
दि ०३ शेळावे ता पारोळा
आज ३ मार्च जागतिक वन्यजीव दिन या निमित्ताने व पुढे विदयार्थ्यांच्या परीक्षा सुरु होत आहेत म्हणुन याच दिवशी २० मार्च जागतिक चिमणी दिन, २१ मार्च जागतिक वन दिन, २२ मार्च जागतिक जल दिन, २३ मार्च जागतिक हवामान दिन असल्याने या दिवसांचे महत्व व सध्याची पर्यावरण रक्षण, जतन व संवर्धनासाठी असलेली गरज लक्षात घेता विद्यार्थी व ग्रामस्थांसमोर विविध उपक्रम मांडुन हे दिवस शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांच्या विविध संकल्पनेतुन साजरा करण्यात आले .
या सुंदर, स्तुत्य व पर्यावरणाचा संपुर्ण जागर करणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेळावे केंद्र प्रमुख जितेंद्र पवार तर प्रमुख पाहुणे म्हणुन शंकर उर्फ बापू नथ्थु कुंभार पारोळा हे उपस्थित होते .
बापू कुंभार यांनी जागतिक वन्यजीव दिन निमित्ताने उन्हाळ्यात पाण्या वाचुन मरणारे पक्षी वाचविण्यासाठी पिण्याचे पाणी भरून ठेवण्याचे मातीचे टिकाऊ बाळगे धाबे गाव व जंगल परिसरात रोज सकाळ संध्याकाळ शेळ्या व गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले . ते एका उंचावरील सुरक्षित स्थानावर ठेवुन सकाळी व सायंकाळी त्या त्या भागात गेल्यावर सोबत पाणी नेऊन रिकामे झालेले बाळगे पाण्याने भरायचे असा हा उपक्रम आहे . याबाबत माहिती व मार्गदर्शन केल्यावर हे नियमित करण्यासाठी गुराखी आनंदाने तयार झाले . तसेच गेल्या सात वर्षापासुन मुख्याध्यापक साळुंखे यांच्या समुपदेशनाने लहान थोर सर्वांनी पक्षी मारण्याची गुलेर व गोफणचा त्याग करून संपुर्ण बंदी केली आहे हे विशेष .
यावेळी विदयार्थ्यांनी वन्यजीव वाचविण्याबाबत एक उदाहरण म्हणुन सर्वात जास्त संकटग्रस्त प्राणी वाघाचे मुखवटे परीधान करून '' वाघ वाचवा " असा संदेश व " आम्ही आहोत राष्ट्रीय प्राणी, आज अवस्था मात्र आमची दीनवाणी, " आम्हाला बंदुकीने नाही तर कॅमेराने शूट करा " असे घोषवाक्यसह प्रदर्शित केला .
२० मार्च चिमणी दिना निमित्ताने चिमणीसह निसर्गातील सर्वच पक्षी महत्वाचे व गरजेचे असुन प्राणी,पक्षी, किटक,जलचर हे पर्यावरण संतुलनाची साखळी आहेत . यातील एकही कडी कमी झाली तर अनर्थ घडेल . मागे चीन या देशाने एक चिमणी महिन्याला पाच किलो पर्यंत धान्य खाते असा शोध लावुन देशातुन चिमणी हा पक्षीच नष्ट करून टाकला . त्याचे परिणाम त्यांच्या पिकांवर किड,आळयाही खाणाऱ्या चिमण्या नष्ट झाल्याने विपरित झाला व साडे चार कोटी लोकांना भूकबळीने आपला जीव गमवावा लागला .नंतर त्यांनी रशियातुन चिमण्या आयात केल्या एवढे महत्व या छोटयाशा पक्षाचे आहे म्हणुन त्यांना न मारता जग़वा व जगु दया असे मार्गदर्शन मुख्याध्यापक साळुंखे यांनी केले . यावेळी विदयार्थीनींनी " चिव चिव आम्ही चिमणी, खेळु दया आम्हाला तुमच्या अंगणी " "आम्ही तुमच्या चिऊताई , जगवा व जगु दया आम्हालाही भाई " अशी घोष वाक्य सर्वांसमोर मांडली .
२१ मार्च जागतिक वन दिन असल्याने व धाबे गांवात सर्व ग्रामस्थ जल, जंगल व जमीनीशी जास्त संबंध येणारे असल्याने वन बाबत त्यांच्यात जास्तीत जास्त जागृती होणे गरजेचे आहे .पर्यावरण जतन संवर्धनात त्यांना सहभागी करून घेणे काळाची गरज आहे . गावात शिक्षकांनी विनंतीने अगोदरच कुऱ्हाड बंदी केली आहे . मान्यवरांच्या हस्ते वनाचे प्रतिक म्हणुन झाडाच्या कुंडीतील रोपाचे जल टाकुन पूजन करण्यात आले .जीवनावश्यक वस्तु वनातुन मिळवितांना त्याला नुसते ओरबाडु नका, एकाच प्रकारचे झाड किंवा वनस्पती नष्ट करू नका . रिकाम्या जागेत शक्य तेवढी झाडे लावा त्यांना जगवा असे मार्गदर्शन वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी केले . "झाडे लावा - झाडे जगवा " वन रक्षण पृथ्वी रक्षण " अशी वन बाबत जागृती करणारी घोष वाक्य विदयार्थ्यांनी प्रदर्शित केली .
२२ मार्च जागतिक जल दिन असल्याने पाणी हा खुपच महत्वाचा घटक असुन त्याची बचत करुन प्रत्येकाने जलसंवर्धन करणे ही काळाची महत्त्वाची गरज आहे . जल साक्षर व्हा . पाण्याचा काटकसरीने वापर व पाण्याची बचत हाच खरा मार्ग आहे असे मार्गदर्शन केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांनी करून गावकरींनी मनसंधारणातुन जलसंधारण हा मार्ग अवलंबुन शक्य झाले तर गावाने वॉटर कप स्पर्धात भाग घ्यावा व श्रमदान प्रत्येकाने करावे असे आवाहन केले .विदयार्थ्यांनी " जल है तो कल है " पाणी आडवा - पाणी जिरवा " अशी घोष वाक्य प्रदर्शित केली .मान्यवरांच्या हस्ते पर्यावरणपूरक मातीच्या जलकुंभाचे म्हणजे जल पूजन करण्यात आले .
२३ मार्च जागतिक हवामान दिन यावर बोलतांना बापू कुंभार म्हणाले माझा मंडपाच्या व्यवसायाबरोबर मातीच्या वस्तु बनविण्याचाही व्यवसाय आहे . मातीची भांडी भाजुन पक्की करावी लागतात . त्यासाठी आम्ही आवा पेटवायचो तो गावात होता अगोदर . त्यातुन निघणारा धूर व होणारे वायु प्रदुर्शन खराब होणारे हवामान यामुळे मी तो बंद केला .आपणही प्लास्टिकचा वापर टाळुन फ्रीज, ए सी किंवा तत्सम वस्तुंमधुन निघणारा विषारी गॅस टाळा, स्वयंपाकासाठी नैसर्गिक किंवा गोबर गॅसचा वापर करा, जुने टायर, तशा रबराच्या वस्तु जाळु नका, रासायनिक खते व पदार्थ अल्प प्रमाणात शेतीत वापरा . हवामान कसे अल्हाददायक व अनुकुल राहिल याची दक्षता घ्या . हवामान बिघडले तर वादळवारे, उष्णता थंडीत वाढ, गारपीट, अती बर्फवृष्टी, धुके, सुनामी, अवकाळी, दुष्काळ, पुर अशा नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात .
हवामान रक्षणाचे प्रतीक म्हणुन स्वयंपाक गॅस हंडीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
पर्यावरण बाबत या सर्व जागतिक दिनांचे महत्व ,उपयोग व फायदे बघुन विदयार्थी व ग्रामस्थ यांनी वरील सर्व गोष्टी पाळण्याचा संकल्प केला . यावेळी पृथ्वीचे विविध भुभाग, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, किटक, जलचर, पक्षी, रेपटाईल्स, साप, पाण्याचे प्रदुर्शन, हवेचे प्रदुर्शन, आवाजाचे प्रदुर्शन, मातीचे प्रदुर्शन, निसर्ग प्रदुर्शन, ग्लोबल वॉर्मिंग, औषधी वनस्पती, उर्जा स्रोत यांच्या चित्रांचे प्रदर्शन व माहिती विदयार्थी व ग्रामस्थांना करुन देण्यात आली .
