मोहम्मद शमी न्यूझिलंडमध्ये कोहलीपेक्षा श्रेष्ठ फलंदाज ठरला
भारतीय क्रिकेट संघाचा सन २०२० चा पहिलाच परदेश दौरा कमालीचा अपयशी ठरला. न्यूझिलंडचा हा दौरा भारताच्या गेल्या काही वर्षातील दौऱ्यांपैकी सर्वात निराशजनक दौरा राहीला. टि-२० मालिकेतील ५-० च्या निर्भेळ यशातही बऱ्याच त्रुटी होत्या, परंतु ती मालिका न भूतो ना भविष्यती अशा अफलातून अंतराने जिंकल्याने त्याची कोणी मोठी चर्चा केली नाही. पहिला सामना न्युझिलंडने दोनशेच्यावर धावा करूनही गमावला.तर दुसऱ्या सामना भारताने सफाईदार खेळ करत खिशात घातला. चौथा व पाचवा सामना नियोजित खेळात टाय झाला. तेथे नशिबाने भारताच्या पारडयात माप टाकले. तर पाचव्या सामन्यात शेवटच्या क्षणी नशिबाने न्युझिलंडला दगा दिला. वास्तविक दुसरा सामना सोडल्यास बाकीच्या सामन्यात भारत जिंकावा इतका सहज सुंदर खेळ भारतीयांनी केला नव्हता. प्रत्यक्षात हि मालिका न्यूझिलंडच्या खिशात ४-१ अशी न जाता भारताच्या पारडयात ५ - ० अशी पडली. इथपर्यंत सगळं अलबेल होतं. मात्र खरी माशी शिंकली ती वनडे मालिकेपासून. वनडेमध्ये गोलंदाजांच्या निस्तेज माऱ्यामुळे मालिका ३ - ० अशी गेली, तर कसोटी २-० अशी गमवायला कारणीभूत ठरले ते फलंदाज.
विश्वविजेत्या भारताच्या पराभवाचे हेच प्रमुख कारणं आहेत. याच अधोगतीमुळे काही अपमानास्पद विक्रम भारताच्या नावावर लागले. त्यावर एक नजर टाकूया.
भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे प्रमुख फलंदाजांची निराशजनक कामगिरी होय. एकाही फलंदाजाने जबाबदारीने सातत्यपूर्ण खेळ केला नाही. या दोन कसोट्यांच्या मालिकेच्या चार डावात पाच प्रमुख फलंदाजांनी मिळून केवळ ४२९ धावा काढल्या. घर के हे शेर भारतात एकेक जण एका मालिकेत इतक्या धावा आरामात काढतात. भारताच्या इतिहासातील ही प्रमुख फलंदाजांची तिसरी सर्वात खराब कामगिरी आहे.
भारतात पाटा व फिरकीला धार्जिण्या खेळपट्टयांवर नांगर टाकून खेळायची सवय असलेल्या भारतीय फलंदाजांना न्यूझिलंडमध्ये जलदगती गोलंदाजांना साह्य करणाऱ्या हिरव्यागार खेळपट्टया मिळताच यांना हुडहुडी भरली व पाय थरथरायला लागले. त्यातच नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्याने संपूर्ण भारतीय फलंदाजीच गलितगात्र झाली.
भारतीय गोलंदाज आपले कार्य इमाने इतबारे पार पाडत असताना न्युझिलंडच्या तळाच्या फलंदाजांनी आश्चर्यजनक कामगिरी करत भारतीयांच्या ओल्या जखमेवर फुंकर घातली. त्यातही खास करून या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ६ फूट ८ इंच उंचीच्या कायले जेमीसनने तर बॅट व बॉलने कहरच केला. पहिल्या कसोटीत ४४ धावा व ४ बळी तर दुसऱ्या कसोटीत ४९ धावा व ५ बळी घेत स्वतःची वेगळीच छाप सोडली. ट्रेंट बोल्ट व नील वॅगनरनेही आपल्या बॅट पाजळत भारतीय गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळविले.
भारतीय फलंदाजांची जलदगती गोलंदाजी खेळण्याची जुनी शोकांतिका न्युझिलंडच्या गोलंदाजांना चांगलीच ठाऊक असल्याने आखूड टप्प्याचे व उसळते चेंडू टाकून त्यांनी भारतीयांना पुरते हैराण केले. न्युझिलंडच्या वेगवान गोलंदाजांनी दोन्ही कसोटीत १९- १९ बळी घेतले. हेच भारतीय फलंदाजांच्या अपयशाचे खरे कारण ठरले.
या संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजीचे पानिपत झाले. परंतु या सर्व घडामोडीत एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट जगातला नंबर एक फलंदाज व कर्णधार विराट कोहलीच्या वाट्याला आली. या दोन कसोटींच्या चार डावात मिळून कोहलीच्या धावा होत्या ३८. तर त्याच्या पेक्षा जास्त धावा होत्या शुध्द गोलंदाज असलेल्या दहाव्या क्रमांकावरील मोहम्मद शमीच्या ४४ धावा.
दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात ७ भारतीय फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. मयंक अग्रवाल व उपकर्णधार अजिंक्य राहाणे तर दोन्हीही डावात दोन अंकी धावसंख्या गाठू शकले नाहीत. सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत पहिल्यांदाच मालिका हरले. तर कोहलीच्या नेतृत्वात प्रथमच व्हॉईटवॉशचा सामना भारताला करावा लागला. पूर्ण मालिकेत प्रमुख फलंदाज मयंक अग्रवाल १०२, पृथ्वी शॉ ९८, चेतेश्वर पुजारा १००, अजिंक्य राहाणे ९१, विराट कोहली ३८, लाडका रिषभ पंत ६०, अशी कामगिरी करत असताना संघाला जिंकण्याची धुसरही शक्यता नव्हती व झालेही तसेच.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एखादया मालिकेत भारतीय फलंदाजांची सर्वात कमी सरासरी जर कोणत्या देशाविरूध्द असेल तर ती आहे न्यूझिलंडविरूध्द ! सन१९६९-७० मध्ये भारतात १६.६१. सन २००२- ०३ मध्ये सर्वात कमी १३.३७ तर आता २०२० मध्ये आहे १८.०५.
सन २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामनाही भारताला न्यूझिलंडविरूध्दच गमवावा लागला होता. त्या पराभवाचे खापर फलंदाजी कोच संजय बांगर यांच्यावर फुटले होते तर आताच्या पराभवाचे खापर उपकर्णधार अजिंक्य राहाणेवर फुटल्यास कोणीही आश्चर्य मानू नये.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.