गीताची भरारी......
तिचा अपघात हदयाला चटका लावणारा.
अमेरिकेतील गायनाचा दौरा आटोपून १४ नोव्हेंबर रोजी गीता माळी मुंबईत परतल्या. छायाचित्रासह त्यांनी " जननी जन्मभूमी स्वर्गसे महान है ..... अशी पोस्ट फेसबुक वर टाकून मायदेशी परतण्याचा आनंद व्यक्त केला होता. त्यांच्या यशस्वी अमेरिका दौऱ्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला होता. या आनंदात असतानाच दुपारी त्यांच्या वाहनाला अपघात होऊन त्या जागीच गेल्याची तर पती ऍड. विजय माळी जखमी झाल्याच्या बातम्या थडकू लागल्या. वाचून विश्वासच बसेना. काही वेळाने छायाचित्रे, व्हिडीओ देखील आले. सर्व पाहून मन सुन्न झाले.गीताचा सर्व जीवन प्रवास डोळ्यासमोर येऊ लागला. संगीतविषयक कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना गीताने मिळविलेले यश,गायनातील वैविध्य ,त्यांच्या आवाजाची जादू , स्वतः ला अहंकाराचा होऊ न दिलेला स्पर्श यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कायमच्या चाहत्या बनत. पूर्वाश्रमीच्या गीता शेवाळे यांचा जन्म १२ सप्टेंबर १९८१ रोजी नाशिक येथे झाला. वडील महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात काम करीत. आई गृहिणी होती.आईला भजन गाण्याची फार आवड होती. ती काम करताना ही भजन गात असे. त्यामुळे गीताला तिसऱ्या वर्षां पासूनच भजनाची आवड निर्माण झाली. घरात पेटी, मृदंग होता. सत्संग ही होत असे.त्यांचा आवाज मुळातच गोड असल्याने शाळेत दररोज सकाळी प्रार्थना म्हणावी लागे.पुढे दहावी झाल्यानंतर आपली आवड ओळखून त्यांनी एस एन डी टी विद्यापीठाच्या नाशिक येथील परफॉरमिंग आर्ट कॉलेजमध्ये बी ए संगीत या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.ही पदवी प्रथम वर्गात प्राप्त केली.२००४ साली त्यांचा विवाह ऍड.विजय माळी यांच्याशी झाला. तेही संगीतप्रेमी असल्याने त्यांनी संगीतात एम ए करण्यास प्रोत्साहन दिले. विवाहानंतर चि. मोहितच्या जन्मानंतर त्यांना काही काळ गायनापासून दूर रहावे लागले. हळूहळू त्या छोट्या कार्यक्रमात गाऊ लागल्या.नंतर हिंदी गायनाकडे वळल्या.तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. *चांदणी फुलाफुलांची* *तिचे गाणे* *गजानन आराधना* *नॉनस्टॉप ९५* असे त्यांचे मराठी गीतांचा व्हिडीओ अलबम आले. *हू बाई शेरणी* हा गुजराती गीतांचा व्हिडीओ अलबम आला. हे सर्व अलबम खूप लोकप्रिय झाले. काही मराठी चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्व गायन केले होते. २०१४ मध्ये त्यांनी ४ महिने अमेरिकेत राहून गायनाच्या कार्यशाळा घेतल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी इंग्रजी गायनाचा अभ्यास केला होता. २०१७ साली औस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात त्यांनी सावरकरांची गीते गाऊन सर्वांची वाहवा मिळवली होती. या शिवाय तेथील आकाशवाणी केंद्रात व इतरत्रही त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले होते.मलेशिया, सिंगापूर, दुबई येथेही त्यांचे कार्यक्रम झाले होते. भारतात ही विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले होते. विविध वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम होत असत. *गितगंगा* ही कम्पनी त्यांनी स्थापन केली होती. विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. अंगभूत गुणवत्ता ,प्रबळ इच्छाशक्ती आणि घरच्यांची योग्य साथ मिळाली तर एका सामान्य कुटुंबातील मुलगीही कसे असामान्य यश, नावलौकिक मिळवू शकते हे त्यांनी दाखवून दिले होते. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबियांचीच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांची खूप मोठी हानी झाली आहे. नियती किती क्रूर असते,याचेच हे उदाहरण आहे. त्या गेल्या, आठवणी राहिल्या.त्यांना विनम्र अभिवादन. - *देवेंद्र भुजबळ*
