ज्यांना आपण खऱ्या अर्थाने गुरु म्हणू शकतो असेे माझ्या आयुष्यात जे शिक्षक मिळाले त्या अनेकांपैकी एक पण अतिशय वेगळे, ज्यांचा मला खूप अभिमान वाटतो असे माझे गुरु श्रीयुत विजयसिंग आधारसिंग पवार सर. अमळनेर तालुक्यातील शिरसाळे या छोट्याशा गावातील माध्यमिक शिक्षक पण ज्यांचं नाव अमळनेरच्या शैक्षणिक, सामाजिक व बौद्धिक चौकटीत अतिशय आदराने घेतले जाते कारण त्यांचं ह्या क्षेत्रातील काम...
गावात शिक्षक म्हणून असताना 2010 साली गावातल्या तरुणांसाठी काहीतरी करावे ह्या उद्देशाने सरांनी तरुणांचे संगठन केले. गावकऱ्यांच्या मदतीने तसेच काही स्वखर्चाने गावात एकाग्रता करिअर डेव्हलपमेंट पॉईंट नावाने एक संपूर्णपणे मोफत अभ्यासिका व मार्गदर्शन वर्ग सुरु केला आणि स्वतः ला यात झोकून देत जिद्दीने हा शैक्षणिक वसा सुरु ठेवला. याचा परिणाम असा होता की शिरसाळ्यासारख्या छोट्याशा गावातील तब्बल 58 मुले शासनाच्या वेगवेगळ्या विभागांत नोकरीला लागले, आणि तेही एकही रुपया न भरता. ही सर्व मुले ही शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कुटुंबातील होती, ज्यांच्या घरात अजून कोणीही सरकारी नोकरीत नव्हते त्यांचे भाग्य उजळले..
या यशानंतर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील तरुणांना या चळवळीचा लाभ घेता यावा म्हणून तालुक्याच्या ठिकाणी अमळनेरला 2016 साली पूज्य साने गुरुजी वाचनालयाच्या मदतीने त्यांच्याच इमारतीमध्ये पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले. याच मोफत मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेतलेला मी एक विद्यार्थी आहे. आजही दर रविवारी न चुकता येथे मार्गदर्शन वर्ग सुरु असतात...
एवढेच नाही, तर ग्रामीण महिलांच्या प्रबोधनासाठी आदरणीय काटे सरांसोबतचा 'चालता बोलता' कार्यक्रम... 'अवकाशावर बोलू काही' नावाचा अवकाश तंत्रज्ञानावरचा माहितीपर व नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ग्रह-ताऱ्यांबद्दलचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम...., तसेच अनेक लेखक, वक्ते यांच्या व्याख्यानाच्या नियोजनात हिरीरीने सहभाग, त्यांतले उत्कृष्ट सूत्रसंचालन..., 'स्पर्धा परीक्षा आपल्या दारी' हा वेगवेगळ्या ग्रामीण भागातील शाळांत घेतला जाणारा करिअर च्या प्रत्येक आयमांना स्पर्श करणारा उत्कृष्ट कार्यक्रम... अशा अनेकविध उपक्रमांतून सरांचे कार्य अविरतपणे चालू आहे.
वरवर अतिशय सोपे वाटणारे हे कार्य तितकेसे सोपे नाही. सुरुवातीच्या काळात सरांना खूप काही अडचणी सहन कराव्या लागल्या. पैसा व पायाभूत सुविधांच्या बाबतीत काही खर्च स्वतःच्या पगारातून तसेच काही मदत वाचनालय तसेच तत्सम व्यक्तींकडून मिळत गेली, माझ्या अमळनेर तालुक्यात तशी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची साने गुरुजींपासूनची परंपरा राहिली आहे.
"मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर,
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया..."
प्रमाणे आज अमळनेर मधील प्रत्येक बौद्धिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर व्यक्ती, तसेच शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेले अधिकारी या उपक्रमाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जोडले गेले आहेत आणि आपापल्या परीने यात योगदान देत आहेत. त्यात सर्वात पुढे पूज्य साने गुरुजी वाचनालयाची कार्यकारीणी (जुनी आणि नवी दोन्ही), मी ज्या शाळेत शिकलो आणि म्हणून मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो ती आर्मी स्कुल, आणि आमचे सर्वांच्या गुरुस्थानी असलेले एस. ओ. माळी सर आणि असे अनेक जण (वाचकांना रटाळवाने वाटू नये म्हणून मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, पण तुमचे योगदान हे नक्कीच बहुमूल्य आहे), अशा लोकांची साथ नेहमीच सरांना मिळत गेली..
पण काही लोक टिंगलटवाळी करणारेही होते, ते का होते मला अजूनही समजत नाही कारण सामाजिक क्षेत्रात टीका कधीकधी ठीक असते पण शैक्षणिक क्षेत्रात टीका का व्हावी? सरांच्या हेतूवर शंका असावी बहुतेक. पण आता तशी परिस्थिती नाही, कारण सातत्याने इतकं चांगलं काम तेही कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता करत राहिल्याने सरांचा हेतू अतिशय शुद्ध आणि पवित्र आहे हे बहुतेकांच्या लक्षात आलेले आहे. विद्यार्थीसंख्या ही सुद्धा सुरवातीच्या काळात अडचण होती, सुरुवातीला फक्त 3-4 मुलांना सलग तीन-तीन तास सातत्याने तेवढेच गुणवत्तापूर्ण शिकवणे... ते आज, रविवारी सगळ्यांची बसण्याची व्यवस्था कशी होईल याची चिंता... हा प्रवासच सरांचा संघर्ष दर्शवतो.
एक ना अनेक अशा अडचणींना सामोरे जात सरांनी हा शैक्षणिक वसा आजही तसाच चालू ठेवला आहे.
माणूस स्वार्थाशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही असेच अनेकांना वाटते, परंतु इथे विशेष उल्लेखनीय बाब अशी आहे की, सरांचा यात कुठलाही स्वार्थ नाही. त्यांनी आतापर्यंत कोणत्याही पुरस्कारासाठी अर्ज केलेला नाही तसेच ते करणारेही नाहीत, कुठल्याही प्रकारे राजकारणाशी संबंध नाही, किंवा निवड झालेल्या मुलांकडूनही आजपर्यंत एक रुपया मागितला नाही. स्वार्थ असला नसला तरी तो फक्त एकच असू शकतो.. तो म्हणजे "समाधान"