पुन्हा तो समीर सलिल शिंपीत आला ,
ज्यात नवलाईने चिंब भिजलो होतो..
कसे विसरू स्पंदन प्रीतीसंगमाचे ,
इथेच प्रीत बंधनात बंधलो होतो ।।ध्रु०।।
इथेच हातात घेऊनी तू हात माझा
सहजीवनाची शपथ घेतली होती
जीव अर्पिला तुझ्यावरी सांगताना
अंगोअंगी तू धुंदीत शहारली होती
आज पुन्हा तो दिस बघ खुलून आला
ज्यात नवलाईने चिंब भिजलो होतो ।।१।।
इथेच विश्वसाचे मनी रंग भरून
निरामय स्नेहाची प्रतिमा सजवली
इथलीच उमलली सुमने घेऊन
अंतरीची किमया तूच गंधीत केली
आज पुन्हा तो दिस बघ खुलून आला
ज्यात नवलाईने चिंब भिजलो होतो...
कसे विसरू स्पंदन प्रीतीसंगमाचे
इथेच प्रीत बंधनात बंधलो होतो ।।२।।
@ अरूण सोनटक्के
अमळनेर