स्वातंत्रपूर्व काळातील एक प्रभावी व्यक्तिमत्व होऊन गेले ,ज्यांना परमपुज्य साने गुरुजींचा सहवास लाभलेला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरणीय पूजनीय मानीत होते .त्यांच्या जीवनावर काँग्रेस आणि राष्ट्रसेवादलाच्या प्रभाव होता त्या काळातील अनेक मान्यवर नेते मंडळींशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. जुन्या काळातील मॅट्रिकची परीक्षा फस्ट क्लास मध्ये पास झालेे त्यानंतर बीएससी देखील फर्स्ट क्लास मध्ये पास झाल्यामुळेे गावातील एक अजातशत्रू ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे अमळनेर प्रताप मिलमधील माजी पर्सानल ऑफिसर अब्बासभाई हसनअली अकिल बोहरी साहेब रविवारी दिनांक 23 जून 2019 रोजी पहाटे यांचे अमळनेरात दुःखद निधन झाले.
कै. अब्बासभाईचा जन्म 25 जानेवारी 1926 रोजी बोहरी समाजातील एक सधन कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळा नंबर 1 ,माध्यमिक शिक्षण प्रताप हायस्कूल ,महाविद्यालयीन शिक्षण प्रताप महाविद्यालय झालेले आहे. सन 1940 41 शैक्षणिक वर्षात ते प्रताप हायस्कूल मध्ये मॅट्रिकला होते त्यावेळी त्यांचे वर्गमित्र होते नामदार दाजीबा पाटील ,आमदार डॉसुरेशदादा पाटील, जानकीराम दादा भांडारकर, पत्रकार माधवराव सुतार, नामदार दाजीबा पाटलांनाही त्यांच्या पडत्या काळात आब्बासभाईंनी सर्वतोपरी सहकार्य केलेले होते.
बी .ए ची परीक्षा पास झाल्यानंतर अमळनेरच्या प्रताप मिलला अब्बास भाई प्रथम टाईम किपर नंतर लेबर ऑफिसर व शेवटी पदोन्नती नंतर पर्सनल ऑफिसर म्हणून नियुक्त झाले .श्रीमंत प्रताप शेटजी यांनी स्वतः त्यांची नेमणूक केलेली होती. श्रीमंत प्रतापशेटजीनीं प्रताप मिलमधील अनेक हिरे शोधून आणलेले होते .श्रीमंत प्रताप शेटजी स्वतः गौरवाने सांगीत असे अब्बासभाई माझा कोहिनूर हिरा आहे. प्रताप मिल मॅनेजमेंट आणि कामगार संघटना यांच्यात त्यांनी सुरेख समन्वय साधला होता .त्यांच्या काळात कधीही कामगार संघटना व मॅनेजमेंट मध्ये संघर्ष झालेला नव्हता. राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी असलेला आदरभाव मातृहृदय परमपूज्य सानेगुरुजींचे डोक्यावर असलेले मातृछत्र व श्रीमंत प्रताप शेठ जींचा औद्योगिक सहवास लाभलेला माणूस सामान्य असू शकत नाही ते असामान्य होते. प्रताप मिलमध्ये छत्तीस वर्ष सर्विस झाली आणि ते सेवानिवृत्त झालेत. त्यानंतर त्यांचे जवळचे मित्र पटेल जर्दा अँण्ड कंपनी टोबँको फॅक्टरीचे मालक कै. दादासाहेब आर.के.दादाचा वाढदिवस दरवर्षी
27 नोव्हेंबर रोजी येत असत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी अब्बास भाई मोठ्या उत्साहाने करीत असत दादांच्या वाढदिवसाची सुरुवात अंमळनेर येथील जुन्या जमान्यातील इन्कम टॅक्स वकील अँड दादासाहेब जी.एम. सोनार यांनी केली होती तीच उज्वल परंपरा पुढे अब्बासभाईनीं पुढे चालवली.
अब्बासभाईनां समाजाविषयी फार तळमळ होती. समाजातील प्रत्येक स्त्री पुरुषांनी शिकले पाहिजे हा त्यांचा अट्टाहास असायचा. बोहरा समाजाच्या अध्यक्षपदी हाजी हमजाभाई बोहरी व सेक्रेटरीपदी अब्बासभाई बोहरी येथील लोकप्रिय जोडीनी तब्बल 35 वर्षे कार्यरत होते .तसेच बोहरी समाजाच्या मदरसा कमिटीचे अनेक वर्षे ते मुख्य ट्रस्टी होते .मुस्लिम समाजातील प्रत्येक सणाच्या वेळी त्यांचा सहभाग असायचा बोहरी समाजातर्फे ईदमिलान कार्यक्रमाची सुरुवात त्यांनीच केली आहे.बोहरी समाजानेही इतर धर्माविषयी नेहमीच प्रेमाचा व शांततेचा संदेश दिला आहे .जळगाव व धुळे जिल्ह्यातील बोहरी समाज बांधव अब्बासभाई कडे नियमित बहुमोल सल्ला घेण्यासाठी येत असत. आमचे बालमित्र तर आवर्जून भेटायला जात असत .त्यावेळी ते परम पूज्य साने गुरुजीं विषयी भरभरून बोलत असत आणि बोलता बोलता एखाद्या मुलासारखे रडून देत असत. परम पूज्य साने गुरुजी म्हणजे त्यांच्या जीवनातील अमूल्य ठेवा होता. सन 1942 चाली परम पूज्य साने गुरूजी हे आपणास अब्बासभाईच्या घरी तीन दिवस भूमिगत होते .त्यानंतर परमपुज्य साने गुरुजींना यशस्वीपणे अंमळनेर बाहेर गडखांबपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अब्बासभाई, दादू पाटील शिंदखेडा यांच्यावर होती. त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. त्यावेळी त्यांनी हैदर मामूच्या टांग्यात बसून आपल्या गुरु माउलींना गडखांब पर्यंत सोडवलेले होते. यावेळी राष्ट्र सेवा दलाची शाखा ही त्रिकोणी बागेत भरीत असे सानेगुरुजींचे परमशिष्य डॉ उत्तमराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ लीलाताई पाटील हे सुभाष चौकातील बोडीत राहत असत .यामुळे अब्बासभाई चे त्यांच्याशी पारिवारिक संबंध होते. त्याकाळी राष्ट्रसेवा दलात मधु लिमये, राम मोहाडीकर ,प्रकाश मोहाडीकर ,दादू पाटील, ग.ना जोशी, गोदी कामगार नेते एस आर कुलकर्णी ,डॉ उत्तमराव पाटील, रामभाऊ भोगे आदींचा अब्बासभाई सोबत सहभाग असे .राष्ट्रपिता महात्मा गांधींची दिनांक 30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीच्या बिर्ला भवनच्या मध्ये हत्या केल्याचा प्रकार व जाहीर निषेधार्थ अमळनेरच्या तहसील कचेरीसमोर पंधरा दिवस काँग्रेस कार्यकर्ते व राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण केले होते त्या साखळी उपोषणाची नियोजनाची तयारी अब्बासभाई कडे होती .गांधीहत्येनंतर साने गुरुजींनी 21 दिवसांचे उपोषण केले होते त्याचे प्रतिसाद महाराष्ट्रात सर्वत्र दिसले होते.
बहुआयामी ऋषितुल्य आजही वयाच्या 95 व्या वर्षी हे इहलोकाची यात्रा संपवून अनंतात विलीन झालेत. त्यांना आपण सर्व अमळनेरकराच्या तर्फे भावपूर्ण आदरांजली. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हि प्रभू चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐💐
अब्बासभाईच्या मागे भाऊ अकबरभाई बोहरी, दोन मुले ,सुना, मुस्तफाभाई,जाहेदभाई ,चार मुली ,तीन पुतणे पुतणी असा मोठा परिवार आहे.बोहरी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहेत.
निवेदन
गं का सोनवणे
जेष्ठ पत्रकार
शब्दांकन
राजेंद्र सुतार मुक्त पत्रकार मुंबई