लोचनी थांबेना अश्रू कुणा मागावा आधार
लाखो रूपयांचे नुकसान, मदतीची अपेक्षा, लोकप्रतिनिधीनीं मदतीसाठी पुढे यावे.
अमळनेर प्रतिनिधी-
भींत खचली चुल विझली
होते नव्हते सारे गेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये
पाणी तेवढे उरले......या कुसुमाग्रज यांच्या कणा कवीतेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अमळनेर शहरात गेल्या दिवसापासून पावसाचे आगमन झाले असताना पाणी मुरून घराचा पाया जीर्ण झाल्याने श्रीकृष्ण कॉलनीतील दुमजली घर अचानक कोसळल्याची घटना दि 30 रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली,विशेष म्हणजे या घरात पती व पत्नी झोपलेले असताना अचानक जाग आल्याने ते पटकन घराबाहेर पळाले यामुळे त्यांचा जीव वाचला मात्र घरातील सर्व सहित दाबले गेल्याने संसाराची राखरांगोळी झाली असून यामुळे महिलेने आक्रोश केला.
एकंदरीत 14 लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी यांनी केला आहे.विशेष म्हणजे कराराने दिलेल्या शेतीचे 40 हजार रुपये एक दिवसांपूर्वीच त्यांना मिळाले होते,ती रकम देखील घरात मातीमोल झाली आहे.या घटनेतून उघड्यावर आलेल्या या कुटुंबास आधार देण्यासाठी आर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे. याबाबत अधिक असे की श्री कृष्ण कॉलनीत सुरतसिंग जगतसिंग तवर यांच्या मालकीचे दुमजली घर असून सद्यस्थितीत धुळे येथे मुलाकडे ते राहत होते,तर अमळनेर येथील घरात त्यांचा पुतण्या प्रितम भरतसिंग तवर यांचा रहिवास असून आपल्या पत्नीसह ते खालील मजल्यावर राहत होते,खाजगी गाडीवर वाहन चालक म्हणून ते कार्यरत असुन साधारण परिस्थितीत आपला रहाट गाडा ते चालवीत आहेत,जेमतेम का असेना सारे काही सुरळीत असताना दि 30ची रात्र त्यांच्यासाठी काळरात्रच ठरली.जेवण करून दोन्ही पती व पत्नी झोपी गेल्यानंतर रात्री अडीच वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या अंगावर माती पडायला सुरुवात झाली,यामुळे त्यांना जाग आली,काहीतरी विपरीत घडत असल्याचा अंदाज त्यांना आल्याने समय सुचकता दाखवीत दोन्ही घराबाहेर पळाले,सुदैवाने ते बाहेर पडताच त्यांच्या डोळ्यादेखत ते घर कोसळले,रात्रीची वेळ त्यात पुन्हा मदतीसाठी कोणीही नाही अश्या परिस्थितीत घरातील सर्व संसारपयोगी सामान पूर्णपणे दाबले जाऊन होत्याचे नव्हते झाले,मात्र ते हतबल असल्याने काहीही करू शकले नाहीत,आवाजाने कॉलनीतील शेजारी जागे झाल्याने त्यांनी दोघांना आधार देत शांत केले.मात्र उभा संसार मातीमोल होत असल्याने महिलेने आक्रोश केला.
सकाळी वीजपुरवठा खंडित करण्यात आला,ही घटना शहरात वाऱ्या सारखी पसरल्याने अनेकांनी धाव घेतली,माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील,नगरसेवक मनोज पाटील,कामगार नेते रामभाऊ संदानशीव,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील,सामाजिक कार्यकर्ते अनंता निकम,योगराज संदानशीव यासह पत्रकार बांधवानी भेट दिली,साहेबराव पाटील यांनी नैसर्गिक आपत्ती म्हणून या कुटूंबास काही मदत मिळेल का यासाठी प्रयत्न करण्याची विनंती अमळनेर तहसीलदाराना केली,व शासकिय मदत मिळण्या अगोदर एक सामाजिक कर्तव्य म्हणून या कुटुंबास आर्थिक मदत करावी असे आवाहन यानिमित्ताने केले.सायंकाळी आ शिरीष चौधरी यानीही भेट देऊन कुटुंबास धीर दिला आणि शासन अथवा कोणत्याही माध्यमातून मदत मिळवुन देण्याची ग्वाही दिली.आ.सौ स्मिता वाघ यानीही भ्रमणध्वनीद्वारे चौकशी करून शासकीय मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
असे झाले 14 लाख नुकसान
शहर तलाठी भावसार व पाटील यांनी घटनेचा पंचनामा करून 14 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे.यात फ्रीज,दोन गोदरेज कपाट,गॅस शेगडी दोन सिलेंडर,2 फॅन,कुलर,मिक्सर,पाण्याच्या टाक्या,30 स्टील डबे,दबल बेड कोट,शिलाई मशीन पिको फॉल मशीन,टेबल ख्ररच्या यासह संसारपयोगी वस्तू व धान्य तर वरील मजल्यावर देखील संसारपयोगी वस्तूंसह व 40हजार रु रोख रकम व घराची किंमत असे एकूण 14 लाख नुकसान झाले आहे एकूण समावेश आहे.आजस्थितीस पती पत्नीजवळ अंगावरील कपड्याशिवाय काहीही शिल्लक नाही.
शासकीय मदत मिळण्यास अडचणी यामुळे दातृत्वाची गरज
या कुटुंबाचे एवढे मोठे नुकसान होऊन देखील शासकीय मदतीसाठी ही घटना निकषात बसत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत,शासकीय निर्देशानुसार अतिवृष्टी अथवा वादळात पडझड झाल्यास नुकसान भरपाई मिळत असते,मात्र दि 28 रोजी शहरात पर्जन्यवृष्टी झाली असून या घराच्या आजूबाजूला मोठा खुला भूखंड असून परिसरातील पाणी येथे जमा होऊन मुरत असते यामुळेच या घराचा पाया जीर्ण होऊन हे घर पडले आहे.म्हणून ही नैसर्गिक आपत्तीच असल्याने शासनाकडून नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे व समाजाने देखील जवाबदारी समजून आर्थिक हातभार लावला पाहिजे अशी अपेक्षा कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.