अमळनेर प्रतिनिधी
कळवा जिल्हा ठाणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध साहित्य संमेलनात बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे राज्य महासचिव जे.एस.जाजू हायस्कूल उत्राण ता. एरंडोल जि.जळगांव येथील उपशिक्षक तसेच प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिक येथे सध्या कार्यरत असलेले प्रा. भरत आत्माराम शिरसाठ यांचा "भीमा कोरेगांव, खैरलांजी आणि इतर कविता" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक व समिक्षक प्रा. शुक्राचार्य गायकवाड, संमेलनाचे उद्घाटक आंबेडकरी चळवळीतील विख्यात साहित्यिक प्रा.डॉ. प्रदीप आगलावे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष क्रांतीसुर्य सामाजिक संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, प्रसिद्ध साहित्यिका इंदिरा आठवले, बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे पदाधिकारी साहित्यिक विद्या भोरजारे, डाँ. सुरेंद्र शिंद, जयवंत सोनवणे व सुनिल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर काव्यसंग्रह श्री शिरसाठ यांचा द्वितीय काव्यसंग्रह असून मराठी भाषे व्यतिरिक्त इंग्रजी भाषेत त्यांची दोन पुस्तके प्रकाशित आहेत. "भीमाकोरेगाव, खैरलांजी आणि इतर कविता" या काव्यसंग्रहास बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे राज्याध्यक्ष प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांची प्रस्तावना असून प्रसिद्ध साहित्यिका विद्या भोरजारेे यांनी सदर काव्यसंग्रहास अभिप्राय दिलेला आहे. प्रशांत पब्लिकेशन, जळगाव या प्रकाशन संस्थे मार्फत सदर काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. सदर काव्यसंग्रहात "भीमा कोरेगाव वरील हल्ला" आणि "खैरलांजीचा कावेबाज वारा" यासह एकूण 40 कवितांचा समावेश आहे. सदर प्रकाशन सोहळ्यास राज्यभरातील आंबेडकरी साहित्यिक उपस्थित होते.