(क्रमशः 2) #ऑनलाईन_शिक्षक.
Covid-19 ने संपूर्ण जग हादरून सोडले या जागतिक संकटातून सावरताना अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत याचा आपण सकारात्मक विचार करायला हवा.
दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन शहरे अनु बॉम्ब टाकून बेचिराख केली परंतु पुन्हा ते राष्ट्र त्याच ताकदीने नव्याने उभे राहतांना जगाने पाहिले. आज तेथील लोकांच्या प्रगतीकडे संघर्षाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.
20 व्या शतकाच्या उत्तरार्धापसून 21 वे शतक हे कॉम्प्युटर युग आहे हे प्रत्येक जनमानसाला ठाऊक होते. आज प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटर मुळे विविध कामे गतिमान व सुलभ झाली आहेत.आधुनिक शिक्षण पद्धतीने पारंपारिक शिक्षणाची अनेक तंत्रे मोडीत काढली, त्यात तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झाला. शिक्षकांनीही काळाच्या पाऊलखुणा ओळखून ही तंत्रे व कौशल्ये आत्मसात केली.गेल्या वीस-पंचवीस वर्षांत तंत्रशिक्षणातून जी प्रगती साध्य झाली त्यातून अनेक तंत्रस्नेही शिक्षकांची निर्मिती झाली व पुढे तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण प्रणालीने आपले पाय घट्ट रोवायला सुरुवात केली. यातूनच ई-लर्निंग सारख्या एज्युकेशन प्रणाली चा जन्म झाला. ही प्रणाली आपले रूप धारण करताना covid-19 सारखे गंभीर स्वरूपाचे संकट जगासमोर निर्माण झाले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण आपल्या सगळ्या यंत्रणा सक्षमपणे राबवू शकलो. या संकटाचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी शिक्षक ई लर्निंग शिक्षण पद्धतीचा वापर करुन अखंड काम करीत आहेत.
ई लर्निंग म्हणजे काय?
ई लर्निंग म्हणजे वर्ग अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वापरण्यात येणारी आधुनिक शिक्षण पद्धती (इलेक्ट्रॉनिक एज्युकेशनल लर्निंग) होय. शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणणारी तसेच शिक्षणाच्या दर्जा उंचावणारी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे कौशल्याधिष्ठित ज्ञानरचनावाद यावर आधारित आधुनिक शिक्षण देणारी पद्धत होय.
ई-लर्निंगच्या साधनांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, मोबाईल, रेडिओ, दूरचित्रवाणी, डीव्हीडी, एलसीडी, मॉनिटर यांचा समावेश होतो. ई लर्निंग साहित्य म्हणून आपण ध्वनीचित्रफिती, ॲनिमेटेड क्लिप, एज्युकेशनल सॉफ्टवेअर, थ्रीडी मॉडेल, इंटरनेटवरील साहित्य, युट्युब, विविध शैक्षणिक वेबसाईट, एलसीडी, प्रोजेक्टर चा वापर करून तसेच गुगल मीट सारख्या ॲप्सचा वापर करून शिक्षक अध्यापन करीत आहेत.
ही प्रणाली अमलात आणताना शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालकांच्या सतत तक्रारी, ऑनलाइन शिक्षणातून काय सध्या होणार? या ई-लर्निंग शिक्षणाचा काहीच उपयोग होत नाही वगैरे.
मुलं अभ्यास करत नाही गेम खेळण्याकडे जास्त लक्ष देतात.लक्षात घ्या सुरुवातीला या साधनांचा वापर मुलांनी गेम खेळण्यासाठी केला. मग त्यात चुकीचे काय? मला हे जरा सोप्प करून नमूद करावेसे वाटतं. मुलांनी कॉम्प्युटर किंवा मोबाईल चा वापर गेम खेळण्यासाठी केला ही तंत्रज्ञानाशी समरस होण्याची पहिली पायरी होय. त्यामुळेच ती साधने युजरफ्रेंडली बनली.आता त्याचा वापर शिक्षणात कसा करायचा हे शिकविणे म्हणजे शिक्षणाची तंत्रज्ञानाशी घातलेली सांगड होय.
काल शिकवत होतो तसेच आजही शिकवत राहिलो तर आपण आपल्या मुलांपासून त्यांचा भविष्यकाळ हिरावून घेऊ असे "जॉन ड्युई" या शिक्षण विचारवंताचे विचार आजही तंतोतंत लागू पडतात. आज सगळीकडे ऑनलाइन शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होत असताना आपण ते हातात हात घेऊन स्वीकारले पाहिजे.
Covid19 मुळे जगावर विपरीत परिणाम झाला असला तरी या शिक्षण क्षेत्रात नवे बदल घडून आले म्हणून याला शिक्षण संक्रमणाचा काळ असेही संबोधले तरी वावगे ठरणार नाही.
व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय?
माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी अध्ययन व अद्यापनकर्त्याला संवाद साधण्यासाठी निर्माण करून दिलेली ऑनलाइन यंत्रणा जिथे एकाच वेळी विविध ठिकाणी असलेले व्यक्ती व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये एकत्र येऊन संवाद साधतात. याचा वापर ऑनलाइन शिक्षण, सभा,वर्ग,गटचर्चा,परिषदा आदी. गोष्टी घडवून आणण्यासाठी होतो.
या आधी मोठमोठ्या शाळा-कॉलेजेस शहरांमध्ये या यंत्रणेच्या वापर प्रासंगिक रित्या होत असायचा ग्रामीण भागात पर्यंत ही सुविधा पोहोचणे हे स्वप्नवत वाटत असे परंतु आज सर्वसामान्य विद्यार्थी व्हर्च्युअल क्लासरूम च्या माध्यमातून शिक्षण घेत असताना दिसून येत आहे.
म्हणून आनंद ही वाटतो.
✍️ प्रा.संदिप महाजन,अमळनेर.


