अमळनेर- 'देवदेवतांच्या नावाने शोषण करणाऱ्या व्यवस्थेला आळा घालणे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मुलन करणे होय..'असे प्रतिपादन येथील आय.एम.ए. हॉल,जी.एस.हायस्कूल येथे सुरु असलेल्या प्रेरणादीप व्याख्यान मालेच्या तिसरे पुष्प गुंफतांना महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष, मा.अविनाश पाटील बोलत होते.त्यांचा व्याख्यानाचा विषय 'मंतरलेली अंधश्रद्धा'असा होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ होते.प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषदच्या आमदार स्मिताताई वाघ व जी.एस.हायस्कूलचे चेअरमन योगेश मुंदडा होते.
अविनाश पाटील पुढे म्हणाले, मंतरलेली अंधश्रद्धा म्हणजे मंत्र मारलेली किंवा भरावलेली ,एखाद्या गोष्टीने प्रभावित केलेली श्रद्धा होय.श्रध्दा वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध करता आली तर तो विश्वास होतो.तर अंधश्रद्धा निर्मुलन करणे म्हणजे आधुनिक विचारांनी जगणे शिकणे होय.माणसाचा विवेक उन्नत करते ती 'श्रद्धा' व विवेक अवनत करते ती अंधश्रद्धा होय.काल्पनिक गोष्टीचं अधिष्ठान देऊन सामान्यांचं शोषण करण्याला आमचा विरोध आहे.अनुकरणातून अंधश्रद्धा बळावत असते.त्यात महिलांच्या अंधश्रद्धा ह्या पराकोटीच्या असतात.राजकीय , सामाजिक क्षेत्रातही मंतरलेली अंधश्रद्धा आहे.अंधश्रद्धेत धर्माची जोड दिली जाते तर अंधश्रद्धा निर्मुलनात धर्माला स्थान नाही.म्हणून जनमानसातील अंधश्रद्धेला तिलांजली दिली पाहिजे. स्मिताताई वाघ म्हणाल्या, की अंधश्रद्धा ही व्यक्तीनिष्ठ असते. महिलांनी ही अंधश्रद्धा मध्ये गुंतू नये. अध्यक्षीय भाषणातून उदय वाघ यांनी सानेगुरुजी चा विचार जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन केले.समता व बंधुभाव नांदला पाहिजे त्यासाठी असे वैचारिक कार्यक्रम झाले पाहिजे.प्रेरणादीप व्याख्यानमालेला शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा वक्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात उत्कृष्ट शाळा म्हणून विजयनाना पाटील आर्मी स्कूल, प्राचार्य एस यु पाटील, चंद्रकांत पाटील(जि. प.शाळा शिरूड), विजयसिंग पवार,शिरसाळे, वसुंधरा लांडगे, अमळनेर,प्रा.विलास पाटील, प्रा.रवींद्र माळी, रवींद्र पाटील,पिंगळवाडे, हेमकांत लोहार तसेच विशेष श्रोता म्हणून डॉ शरद पाटील या शिक्षकांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंचचे संस्थापक सदस्य डी.ए.धनगर यांनी केले.वक्त्यांचा परिचय विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी करून दिला.सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विजय पाटील यांनी केले.
