जेंव्हा टि-२० क्रिकेटचा उगम झाला तेंव्हा कोणीही त्याला गंभिरतेने घेतले नव्हते. काहीतरी फालतू खेळ म्हणून त्याकडे तेंव्हा सर्वच जण बघत होते. कोणालाही वाटले नव्हते की, हे क्रिकेट केवळ खेळाडूंवरच नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वावर राज्य करेल. परंतु आज टि-२० ने क्रिकेटचा नकाशाच बदलून टाकला आहे.
त्याच धामधुमीत सन २००७ च्या पहिल्या टि-२० विश्वकरंडकात भाग घेण्यासाठी भारतीय संघ गेला तेंव्हा भारतीय संघाला या फटाफट प्रकारच्या खेळाचा काडीचाही अनुभव नव्हता. परंतु अनपेक्षितपणे भारताने तो विश्वकरंडक जिंकला, आणि भारतीय क्रिकेटचं रूपच बदललं. क्रिकेटशी संबंधीत प्रत्येकात नवा संचार आला. नेमका त्याच काळात भारतात झी उद्योग समुहाची आयसीएल ही अनधिकृत लिग स्पर्धा सुरू झाली. तिच्यामुळे थेट बीसीसीआयच्याच अस्तित्वालाच धोका निर्माण झाला होता. अनेक मातब्बर खेळाडू आयसीएलमध्ये सामील होऊ लागले त्यामुळे बीसीसीआयची झोपच उडाली. त्याच दरम्यान ललित मोदीने आयपीएलची कल्पना काढली व आज तीच आयपीएल जगातील सर्वात लोकप्रिय लिग म्हणून गणली जाऊ लागली.
१८ एप्रिल २००८ रोजी कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू यांच्यात उद्घाटनाचा सामना झाला. तेरा वर्षात पाहिल्यांदाच हि स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे खंडीत झाली आहे. बरे असो थोडं विषयांतर झालं पण आपल्याला आयपीएलच्या वाढदिवसाची आठवण करून द्यायची होती.
सन २००७ च्या टि-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास काही वरिष्ठ खेळाडूंनी नकार दिला होता. त्यामुळे निवड समितीने संपूर्ण नवाच संघ स्पर्धेला पाठविला आणि चमत्कारच घडला. चक्क भारत विश्वविजेता बनला ! त्यानंतर वरिष्ठ खेळाडूंना पश्चाताप झाला. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्यानंतर त्या तिन सिनियर्सला टि-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारतीय संघात निवडले, परंतु त्यांचा तो पदार्पणाचा सामना अखेरचाच ठरला. चला तर जाणून घेऊ या त्या तिन जणांची कहाणी.
क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडूलकर आपल्या क्रिकेट कारकिर्दीत वनडे व कसोटी सामने विक्रमी संख्येने खेळला मात्र टि-२० मध्ये त्याची पाटी कोरी राहण्यावाचून बचावली. त्याच्या टि-२० करिअर मध्ये तो एकच सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळलेला तो टि-२० सामना त्याच्या आयुष्यातला पहिला व शेवटचा ठरला. फलंदाजी करताना १२ चेंडूत १० धावा केल्या असता चार्लस् लँगवेल्टच्या चेंडूवर तो बाद झाला. एवढेच नाही तर गोलंदाजीत २.३ षटकात १२ धावा खर्चून जस्टिन केंपचा बळी मिळविला. त्या सामन्यानंतर टि-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात तो पुन्हा कधीच भारतीय संघात निवडला नाही.
भारतीय क्रिकेटचा सतत आधारस्तंभ सिध्द झालेला राहुल द्रविड ३१ ऑगष्ट २०११ मध्ये इंग्लंडविरूध्द मँचेस्टरला पदापर्णाचा टि-२० सामना खेळला. त्या सामन्यात त्याने समित पटेलच्या एका षटकात सलग तीन चेंडूवर ३ षटकार ठोकत २१ चेंडूत ३१ धावांची धुवाँधार खेळी खेळली. परंतु भारत तो सामना सहा गडयांनी पराभूत झाला. त्यानंतर मात्र द्रविडलाही निवड समितीने पुन्हा संधी दिली नाही. त्यामुळे त्याचाही पदार्पणाचा सामना अखेरचाच ठरला.
दिनेश मोंगिया हा सचिन, द्रविड इतका मातब्बर नसला तरी भारतीय क्रिकेटमध्ये त्याची चांगली ओळख होती. हाच मोंगिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच पदार्पणाचा टि -२० सामना खेळला. त्या सामन्यात ४५ चेंडूत चार चौकार व एक षटकार ठोकून त्याने ३८ धावा ठोकल्यानंतर चार्लस लॅगवेल्टने रॉबीन पिटरसन करवी त्याला झेलबाद केले.
त्यानंतर तो विद्रोही आयसीएलमध्ये खेळला. त्यानंतर परत त्याच्यासाठी कधीच भारतीय संघाचे दार उघडले नाही.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
